शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

पुणे, १२ डिसेंबर २०२२ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच राज्य पोलीस यांच्या सुरक्षेसोबतच चंद्रकांत पाटील यांना सीआयएसएफ या केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा देखील देण्यात आली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकारही शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी या घटनेवेळी तैनात असणारे ११ पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आज पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेला भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी वारजे पोलीस स्टेशनचे पन्नास पोलीस, क्राईम ब्रांचचे पाच अधिकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा