बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात बदल

पुणे, ता. १२ डिसेंबर २०२२ : बांगलादेशविरुद्ध बुधवारपासून (ता. १४) सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ‘बीसीसीआय’ने भारतीय संघात बदल केले आहेत.

संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी के. एल. राहुलकडे कसोटी मालिकेची कमान सोपविण्यात आली आहे. पहिल्या कसोटीसाठी रोहितच्या जागी भारत-अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. ईश्वरन सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेश-अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यात तो भारत-अ चे नेतृत्व करत होता. बांगलादेश-अ विरुद्धच्या मालिकेत ईश्वरनने बॅक-टू-बॅक सेंच्युरी झळकावली. बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ईश्वरनने १४१ धावा केल्या. त्याचवेळी दुसऱ्या कसोटीत त्याने १५७ धावा केल्या.

यासोबतच मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडले आहेत. ‘बीसीसीआय’च्या म्हणण्यानुसार शमी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तर अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या जागी जयदेव उनाडकट, तर जडेजाच्या जागी डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : के.एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, के. एस. भरत, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा