चंद्रपूर, २९ जुलै २०२३ : जिल्ह्यात चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ५४% इतका पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे इरईसह झरपट नदीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर शहराच्या उत्तरेला इरई धरण आहे. धरण परिसरात मागील आठवडाभर जोरदार पाऊस झाल्याने इरई धरण तब्बल ८७% भरले आहे. धरणाचे सात पैकी दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदीत काल सकाळी १० वाजता पाण्याचा विसर्ग सुरु झाला. इरई नदी चंद्रपूर शहराच्या पश्चिमेकडून वाहते आणि पुढे जाऊन दक्षिणेकडील वर्धा नदीला मिळते.
परंतु वर्धा नदीलाच पूर आल्याने इरईचे पाणी वर्धा नदीत प्रवाहित होण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे इरई नदीचे पाणी पात्र सोडून चंद्रपूर शहरात घुसले आहे. इरई धरणाचे अजूनही काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस थांबला नाही तर शहराला असलेला धोका अजूनच वाढण्याची शक्यता आहे.चंद्रपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, हे रेस्क्यू ऑपरेशनही कठीण होते. रेस्क्यू ऑपरेशनवेळी एक अपघात घडला. मात्र यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. चंद्रपुरात पावसाने थैमान घातल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पावसामुळे राजुरा-बल्लारपूर, राजूरा-सास्ती, धानोरा-भोयगाव, गौवरी कॉलनी-पोवणी, कोरपना-कोडशी, रूपापेठ-मांडवा, जांभूळधरा-उमरहिरा पिपरी-शेरज, पारडी-रुपापेठ, कोडशी-पिपरी, कोरपना-हातलोणी, कुसळ-कातलाबोडी,कोरपना शेरज-हेटी हे रस्ते बंद आहेत.
अनेक मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर अनेक तासांपासून वाहने उभी आहेत. तर काही जण पुराच्या पाण्यातूनच वाट काढताना दिसत आहेत. पुराचे पाणी शहरात घुसले आहे.तर दुसरीकडे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर