अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या बसला बुलढाण्यात अपघात, ५ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

बुलढाणा, २९ जुलै २०२३ : अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या बसला महाराष्ट्रातील बुलढाण्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदूर नाका उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला बस थेट धडकली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथिल राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हा अपघात झाला. मलकापूर येथील नांदूरनाका उड्डाणपुलावर दोन बसची समोरासमोर धडक झाली. रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस हिंगोलीकडे जात होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे अडीच वाजता बसची धडक झाली. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर झालेल्या या अपघातात महिला प्रवाशांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

अमरनाथ यात्रेकरूंची ही बस हिंगोलीकडे निघाली होती. बालाजी ट्रॅव्हल्सची दुसरी हायस्पीड बस नाशिककडे निघाली होती. हिंगोलीकडे जाण्यासाठी बसचालकाने ट्रकला ओव्हरटेक केले असता, समोरून बस येत असल्याचे पाहून त्याचे नियंत्रण सुटले.

या भीषण अपघातात २ महिलांसह ३ पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला. दोन्ही बसमधील किमान २० जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना बुलडाण्यातच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी त्वरित बसेस रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा