चंद्रपूर, दि. ३० मे २०२०: चंद्रपूर मध्ये एका दारू तस्करी करणाऱ्याने पोलिसावर हल्ला केला आहे. एका पोलीस उप निरीक्षकावर हल्ला झाला आहे. रामनगर येथील पोलीस चौकी मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जीवन लकडे यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. आरोपीचे नाव अमित गुप्ता असे असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमित गुप्ता हा दारूची वाहतूक करतो अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस डिस्पेंसरी चौक येथे दाखल झाले. पोलीस निरीक्षक जीवन लकडे व त्यांच्या ४ पोलीस सहकारी घटनास्थळी उपस्थित होते. जीवन लकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाहून गुप्ता याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करू लागला.
अमित गुप्ताने आपली गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळवली व घरापाशी येऊन थांबला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये चार पेटी दारू सापडली. पोलिसांनी ही दारू जप्त केली असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करण्यामध्ये अमित गुप्ता व त्याचे आई-वडील व इतर सहकारी सहभागी होते.
त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये जीवन लकडे व त्यांच्या सहकाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये डोक्याला व डोळ्यावर जबर मार लागल्याचे जीवन लकडे यांनी सांगितले. जीवन लकडे यांच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे. यानंतर एकूण पाच आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी