गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक एप्रिलपासून सुरु होणार चारधाम यात्रा; केदारनाथ धामचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार

एप्रिलपासून सुरु होणार चारधाम यात्रा; केदारनाथ धामचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार

उत्तराखंड, १८ फेब्रुवारी २०२३ :उत्तराखंडची चारधाम यात्रा यावेळी २२ एप्रिलपासून सुरू होत आहे. २२ एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे पोर्टल उघडणार आहेत. तर मोक्षधाम बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुले होत आहेत. आज महाशिवरात्रीच्या दिवशी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भगवान केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिलला उघडतील. यासोबतच बद्री केदार मंदिर समितीने केदारनाथ धामकडे रवाना होणार्‍या बाबा केदारनाथच्या डोलीचा संपूर्ण कार्यक्रमही प्रसिद्ध केला आहे. बद्री केदार मंदिर समितीने जारी केलेल्या डोली प्रस्थान कार्यक्रमानुसार बाबा केदार यांची डोली २१ एप्रिल रोजी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून निघणार आहे. २१ एप्रिलला बाबांची डोली गुप्तकाशीत रात्रीचा विसावा घेणार आहे. २२ एप्रिलला बाबांची डोली फाट्यावर पोहोचेल. २२ रोजी फाटा येथेच डोली विसावणार आहे.

तर उत्तराखंड चारधाम यात्रा २२ एप्रिल २०२३ पासून सुरू होत आहे. आता गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार धामांचे पोर्टल उघडण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सर्व प्रथम गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील. यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे उघडतील. शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील.

  • अक्षय्य तृतीयेला उघडणार गंगोत्री, यमुनोत्रीचे दरवाजे

उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या गंगोत्री आणि यमुनोत्री या दोन्ही धामांचे दरवाजे २२ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उघडले जातील. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामचे दरवाजे २७ एप्रिल रोजी तर केदारनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिलला उघडतील. अशाप्रकारे उत्तराखंडची प्रसिद्ध चारधाम यात्रा २२ एप्रिलपासून सुरू होणार असून ही यात्रा ६ महिने चालणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version