युरोप, १७ मे २०२३: युरोपियन युनियनचे नियम पाहता रशियन कच्चे तेल मोठ्या प्रमाणावर तिसऱ्या देशांमध्ये वळवले गेले आहे. ते आता रशियन मानले जात नाही. त्यामुळे आता युरोपियन युनियनने स्वतःचा नियम तपासावा, अशा शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युरोपियन युनियनला खडसावले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी कायम ठेवली. यावर पुन्हा एकदा युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुखांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किंमतीत चढ उतार पाहयला मिळत आहेत. या युद्धानंतर अनेक देशांनी संतप्त होऊन रशियावर निर्बंध लादले. दरम्यान भारताने युरोपातील देशांचा दबाव झुगारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी कायम ठेवली. याला सुरवातीपासून युरोपियन युनियनने आक्षेप घेतला आहे.
युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी बुसेल्समधील बिझनेस टेक्नॉलॉजी टॉक्समध्ये जयशंकर यांची भेट घेतली होती. परंतु त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहिले नाहीत. त्याचवेळी पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी युरोपियन युनियनला खडसावले. यावर युरोपियन युनियनच्या कार्यकारी उपाध्यक्ष मार्गारेट वेस्टेजर म्हणाला की, भारत आणि युरोप हे चांगले मित्र आहेत. त्यांनी एकमेकांशी सामान्य संबंध ठेवले पाहिजेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर