आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणीत सोडले केमिकलयुक्त पाणी, वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात

पुणे, ७ जून २०२३ : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर अधूनमधून कारवाई करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी मनपाने सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर त्यांच्यांवर गुन्हा दाखल झाला. परंतु या कंपन्यांकडून इंद्रायणीत केमिकल युक्त पाणी सोडणे काही केल्या बंद होत नाही. आता वारीत येणारे वारकरी या नदीत आंघोळ करतात. आता आषाढी वारीला सुरुवात होत आहे. आधीच नदीचे पात्र जलपर्णीने व्यापले असून, आता आषाढी वारीच्या तोंडावरच नदीत केमिकल युक्त पाणी सोडले गेले आहे. यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

इंद्रायणी नदी पुन्हा एकदा केमिकलच्या पाण्यामुळे फेसाळली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान ११ जूनला होणार आहे. असे असताना वारीतील वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा हा प्रकार सुरु आहे. चार दिवसांवर वारी आली असताना केमिकल युक्त पाणी सोडल्याने इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा एकदा फेसाळ्याचे पाहायला मिळत आहे.

इंद्रायणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी विस्तारली आहे. त्यामुळेही प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. इंद्रायणी नदीवर अनेकवेळा बर्फाची चादर दिसते. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे बर्फाची चादर दिसते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली होती. नदी पात्रात अनेक ठिकाणी फेसच-फेस दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदीची अशी अवस्था होत असते. परंतु त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा