चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी केला पराभव, अजिंक्य रहाणेने खेळली तुफानी खेळी

मुंबई, ९ एप्रिल २०२३: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत १५७ धावा केल्या. १५८ धावांचा पाठलाग करण्साठी उतरलेल्या चेन्नईला पहिल्याच षटकात एक विकेट गमवावी लागली. मात्र रहाणेने घरच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करत अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. शिवम दुबेने २८ धावा तर ऋतुराज गायकवाडच्या ४० धावांच्या जोरावर चेन्नईने मुंबईला सहज चारी मुंड्या चीत केले.

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लक्ष्य जरी कमी असले तरी ते पार करणे सोपे नक्की नसेल, याची कल्पना सीएसके ला होती. जेसन बेहरेनडॉर्फने पहिल्या दोन चेंडूवरच त्याची प्रचिती घडवली. तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेने फटका मारला, परंतु चेंडू बॅटला लागून यष्टिंवर आदळला. चेन्नईसाठी रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी तुफानी कामगिरी केली. शिवम दुबे आणि अंबाती रायडू यांनीही फलंदाजीत उपयुक्त योगदान दिले.

दरम्यान, गेल्या दोन सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने मुंबईतील घरच्या मैदानावर जबरदस्त पुनरागमन केले. तुषार देशपांडेने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला उत्कृष्ट चेंडू टाकून पायचीत केले. त्याचवेळी फिरकीपटू मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला अधिक काळ टिकू दिला नाही. जडेजाने गोलंदाजीत तीन विकेट्स घेतले.

रहाणे झंझावाती खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि चेन्नईचा विजय जवळपास निश्चित केला, तर ऋतुराज गायकवाडने संघाला विजयापर्यंत नेले. पहिल्या दोन सामन्यात झटपट अर्धशतकं झळकावणाऱ्या ऋतुराजने यावेळी आरामात डाव संपवला आणि १९व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा