छत्रपती मराठा साम्राज्यतर्फे दुबईमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

दुबई १२ जून २०२४ : शिवराज्याभिषेक दिन म्हणजे स्वराज्यातील अठरापगड जातींच्या मावळ्यांना घेऊन केलेली एक सामाजिक क्रांती होती. सर्वसमावेशक, आदर्श शासनकर्ते, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ०६ जून १६७४ रोजी झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) ग्रुप, दुबई यांच्यातर्फे दुबई येथे दुसऱ्यांदा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे, शाहीर शिवराज भोर-पाटील, सिने अभिनेता निखिल निगडे, राजेश बाहेती, संतोष गायकवाड, सतीश काटे, योगेश कदम, सचिन कदम, विद्या चोरगे, सोमनाथ पाटील उपस्थित होते.

तात्कालीन परिस्थितीमध्ये विविध राजे औरंगजेबासमोर शरणागती पत्करत असताना शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य हे एका राजाचे नव्हते, तर ते रयतेचे होते. शिवराज्याभिषेक हा स्वराज्यातील रयतेच्या स्वातंत्र्याचा सोहळा होता. हा रयतोत्सव होता, असं वक्तव्य प्रवीण तरडे यांनी केले. दुबई येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शुभेच्छा शिव-संदेश पत्र देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही तरडे यांनी दुबईमधील शिवप्रेमींना दिली. शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी तरडे यांनी जिवलग मित्राचा केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीला जाण्याचे टाळून, दुबई येथील शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला उपस्थिती लावली याबद्दल दुबईतील शिवप्रेमींच्या कडून तरडे यांचे कौतुक करण्यात आले. याचबरोबर त्यांनी शिवरायांची विविध गुणवैशिष्ट्ये दुबईमधील शिवप्रेमींच्या समोर मांडली. शिवरायांच्या कडून प्रेरणा घेत आयुष्यात वाटचाल करावी. शिवरायांच्या सोबतचे सर्व मावळे शेतकरी, कष्टकरी होते. त्यामुळे आज आपण त्या मावळ्यांचा वारसा चालवताना “जमीन विकायची नाही, तर राखायची” हा काळजाला भिडणारा संदेश त्यांनी दिला.

यावेळी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि थोरले शाहू महाराज (पहिले) यांच्या जगभरात असलेल्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. संदीप कड यांनी शिवराज्याभिषेक दिन याचे महत्त्व आणि ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे वर्णन दुबईकरांना सांगितले. शिवशाहीर शिवराज भोर पाटील यांनी गगनभेदी आवाजात विश्ववंदनीय शिवराय यांच्या कार्यकर्तुत्वावर पोवाडा गायला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ ब्रिगेड, दुबई यांच्या सुरेल आवाजात जिजाऊ वंदना गायनाने आणि विक्रम भोसले, मुकुंदराज पाटील यांच्या पहाडी आवाजातील शिवगर्जनेने झाली. सीएमएस ग्रुप आणि त्यांच्या कार्या संदर्भात पंकज आवटे यांनी सखोल माहिती सांगितली. ०६ जून चे औचित्य साधून विनायक पवार यांच्या माध्यमातून दुबई येथे शिवकालीन शस्त्रे प्रतिकृती स्पर्धेचे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील महिलांनी सुरू केलेल्या दुबईमधील मधील पहिल्या “स्वामिनी” महिला ढोल ताशा पथक आणि दुबईमधील युवकांच्या “श्रीमंत ढोल ताशा पथक,” यांच्याकडून ढोल ताशाच्या गजरात मानवंदना देण्यात आली. तसेच मिलिंद माणके, मीनल पारंगे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

स्वामिनी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून पल्लवी निगडे, सुवर्णा पाटील, अश्विनी गावडे आणि टीम यांच्याकडून “शिवरायांचा जन्म ते राज्याभिषेक प्रवास” याच्यावरती शिवनाटिका सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा पवार, विशाल जगताप, ऋतुजा विचारे आणि पंकज आवटे यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दुबईमधील मराठी नवउद्योजकांचा, विविध सामाजिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत देशमुख, विक्रम भोसले, अमोल डुबे-पाटील, संदीप कड, मुकुंदराज पाटील, गणेश डफळे, सुनिता देशमुख, प्रियांका भोसले, संध्या कड, विनायक पवार, सुहास झांजे, शिवाजी काका नारुने, रघुनाथ सगळे, अक्षय माने यांनी केले तर संदीप पवार यांनी आभार मानले. सर्व सह-सयोंजक टीम ने खुप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण CMS live, दुबई च्या माध्यमातून जगभर प्रसिद्ध करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा