मुंबई, ९ एप्रिल २०२३: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह अयोध्येला रवाना झाले आहेत. शिंदे शनिवारी रात्री उशिरा लखनौला पोहोचले असून रविवारी सकाळी ते अयोध्येला पोहोचतील. अयोध्येत ताकद दाखवून एकनाथ शिंदे हिंदुत्वाचे राजकारण करणारा नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. अयोध्येत शिवसेनेचे झेंडे आणि मुख्यमंत्र्यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
त्यानंतर, शिंदे हे रस्त्यामार्गे अयोध्येकडे रवाना झाले. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मोठ्या संख्येने शिवसैनिक आयोध्येत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिंदे हे दुपारी १२ च्या सुमारास प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील. ते हनुमान गढी येथेही जाऊन दर्शन घेणार असून भव्य राम मंदिराच्या बांधकामाची पाहणीही करणार आहेत. अयोध्येत शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. चलो आयोध्या.. प्रभू राम के सन्मान में, हिंदुत्व का तीर कमान, असे बॅनर ठीक-ठिकाणी लावण्यात आले आहेत. जय शिवसेनेचे भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह आणि भगव्या पताकांनी परिसर भगवामय करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अयोध्याच्या दिशेने रवाना झाले आहे. फडणवीस हे आज दुपारी १२ वाजता अयोध्येला आरतीला उपस्थित राहणार आहेत. यानंतर साडेचार वाजता मंदिराच्या निर्माण कार्याचाही आढावा घेणार असल्याचे समजत आहे. फडणवीस यांना आज दिल्लीमध्ये एका बैठकीला उपस्थित रहायचे आहे. यामुळे ते दिल्लीला जाताना अयोध्येवरून जाणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड