सांगली २१ जून २०२० : महापूर नियंत्रणासाठी कर्नाटकसोबत संवाद-समन्वयचा भाग म्हणून पुढील आठवड्यात जलसंपदा मंत्री स्तरावर आणि त्यानंतर बेळगाव अथवा कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री स्तरावर बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली. यानिमित्ताने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा प्रथमच भेटणार आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी महापूराच्या अभ्यास समितीच्या अहवालातील नदीपात्रातील अतिक्रमणे व बांधकामाबाबत शासनस्तरावर धोरण ठरेल असे सांगितले. मात्र त्यांनी तातडीने त्यावर कार्यवाही शक्य नाही असे सांगत अहवालाच्या संपुर्ण अंमलबजावणीबाबत असह्यता व्यक्त केली.
गतवर्षीच्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रशासकीय स्तरावर उपाययोजनांच्या हालचाली सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सात मंत्री, चार खासदार आणि चौदा आमदारांसह अधिकारी-लोकप्रतिनिधींची जंगी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीनंतर मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.
यावेळी पाटील म्हणाले की, “गतवर्षी कृष्णा, वारणा, पंचगंगा, कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबतच्या वडनेरे समितीच्या अभ्यास अहवालाची शासनस्तरावर छाननी सुरु आहे. या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी शक्य नाही.”
दरम्यान, समितीने तातडीने संभाव्य पूरस्थितीबाबत सूचवलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी होईल. पुढील आठवड्यात मी कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याशी कोल्हापूरात प्राथमिक चर्चा करणार आहे, त्यानंतर मुख्यमंत्रीस्तरीय बैठक होईल, असे पाटील यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी