मुंबई, २६ एप्रिल २०२०: आज उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी पुन्हा एकदा संपर्क साधला आहे. सुरुवातीला त्यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर रमजानचा महिना चालू आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांना देखील रमजानच्या हिंदीमधून शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, “या संकटाच्या काळात अनेक सण येऊन गेले मग ते कोणत्याही धर्माचे असो परंतु सर्वांनी सहकार्य दाखवले त्याबाबत मी सर्वांचे आभार मानतो.”
सणांविषयी बोलताना ते म्हणाले की, “सध्या देव देवळात शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा, माणसांमध्ये शोधा, तुमच्या-आमच्यासाठी राबत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये शोधा, पोलिसांमध्ये शोधा तसेच सफाई कामगारांमध्ये शोधा.”
आज आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यामुळे एकूण दोन पोलीस कर्मचारी आत्तापर्यंत या प्रादुर्भावामुळे बळी पडले आहेत. ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते म्हणाले, “कुठेही एखादी घटना घडली की पोलीस काय करत होते असा आपण त्यांच्यावर आरोप ठेवतो. परंतु प्रत्येक वेळेस तिथपर्यंत पोचणे त्यांना शक्य होतेच असे नाही. आज हे कोरोनाचे युद्ध लढता लढता आपले दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. शासकीय पद्धतीने जी जी मदत केली जाते ती सर्व मदत तर सरकार करेलच, परंतु त्यापेक्षाही जास्त जे काही शक्य असेल तेही केले जाईल. मदत केली तरी माणूस तर गेलाच आहे” अशी हळहळ देखील त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की या संकटाच्या काळात सरकार शक्य होईल तेवढे लॉक डाऊन संपविण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. आर्थिक अडचणी असोत किंवा वैद्यकीय अडचणी असो सगळ्यांसाठी तज्ञ मंडळी नेमली गेली आहेत. या परिस्थितीमधे कोणीही घाणेरडे राजकारण करू नये असे आव्हान देखील त्यांनी केले. विशेषतः त्यांनी नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले.
केंद्र सरकारचे पथक सध्या महाराष्ट्रात आलेले आहे. त्यावरही राजकारण करत काही मंडळी उद्धव ठाकरेंना असे म्हणत आहे की दाल में कुछ काला है. यावर उत्तर देत ते म्हणाले की दाल मे कुछ काला आहे की नाही त्याआधी डाळ असणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने तांदुळाबरोबरच डाळ व इतर अन्नधान्य पुरवावीत असे देखील त्यांनी सांगितले. केशरी रेशन कार्ड धारक सर्व जनतेला अन्नधान्य पोहोचण्यासाठी सरकारकडून अधिक धान्य मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनतेच्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानत असतानाच यापुढेही असे सहकार्य मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.