अठरा वर्षांखालील मुले दुचाकीवरून सुसाट…

9

निगडी, २९ जानेवारी २०२३ : शाळा, महाविद्यालय, शिकवणी आदी दिवसभराचा व्यस्त कार्यक्रम… प्रत्येक ठिकाण घरापासून दूर… वेळही पाळायची, अशावेळी वाहनाशिवाय पर्याय नाही; पण वयात न आल्याने परवाना नाही. मग, विनापरवाना दुचाकीवर स्वार व्हायचे. इयत्ता नववीच्या ‘व्हेकेशन’पासूनच विद्यार्थ्यांचा हा दिनक्रम सुरू होतो. दहावीनंतर वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या शिकवण्या, शिवाय विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना तर प्रात्यक्षिकेही सांभाळावी लागतात. सकाळी सहा-सातपासूनच त्यांची ही धावपळ सुरू होते. अन् या धावपळीच्या युगात वाहन वापरण्याशिवाय पर्याय उरत नाही. पालकही पाल्यांच्या सोयीसाठी वाहन वापरायला अनिच्छेने का होईना परवानगी देतात; मात्र विनापरवाना वाहन चालविण्यासंबंधी नियम कठोर झाले असून, थेट पालकांवर गुन्हा दाखल होत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरीही मुले दुचाकीवर सुसाट फिरताना दिसतात.

तांत्रिकदृष्ट्या १८ वर्षांखालील मुलांना वाहन परवाना दिला जात नाही. ५० ‘सीसी’पर्यंतच्या वाहनांसाठी १८ वर्षांखालील मुलांना लर्निंग लायसन्स दिले जाते. त्याचे दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करावे लागते; परंतु सध्याच्या काळात ५० ‘सीसी’पर्यंतचे वाहन बनविलेच जात नाही. त्यामुळे मुलांची मोठी अडचण होते.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी खासगी शिकवणी लावतात, त्यासाठी त्यांना शिकवणी, शाळा, महाविद्यालय आदींचे नियोजन पाळण्यासाठी वाहनाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. काही मुले-मुली सायकलीवरही धावपळ करतात; मात्र त्यात वेळ व श्रम वाया जात असल्याने मुलांची अडचण होते.

विशेष म्हणजे सध्याच्या वाहन परवाना देण्याच्या नियमानुसार १८ वर्षांवरील मुलांनाच तो दिला जातो. प्रत्यक्षात बारावीपर्यंतही मुले १८ वर्षांची होत नाहीत. बारावीनंतर किमान वर्षभराने त्यांचे वय १८ होते. तेव्हा त्यांना परवाना मिळू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम योग्यच असला, तरी बदलत्या काळात तो कालबाह्य ठरत आहे. बारावीपर्यंत गेलेले बहुतांश विद्यार्थी कारही चालवायला शिकतात तेही अन्य व्यावसायिक चालकाप्रमाणेच.

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आपल्या नियमांमध्ये काहीअंशी बदल करायला हवेत. त्यासाठी किमान १६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विनागिअरच्या वाहनाचा परवाना देण्यास हरकत नाही. आगामी काळात तसे झाले नाही तर हजारो, लाखो विद्यार्थी विनापरवाना दुचाकी दामटताना दिसतील. खरेतर वाहन परवान्यासाठी निश्‍चित केलेली किमान १८ वर्षे वयाची मर्यादा सध्याच्या काळात योग्य नाही. दहावीनंतरच मुलांना वाहनाची आत्यंतिक गरज भासते. अशा वेळी विनागिअरच्या वाहनासाठी परवाना देण्याची १८ वर्षे वयाची अट शिथिल करून ती १६ वर्षे करता येण्यासारखे आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील