पिंपरी, पुणे २८ जुलै २०२३ : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याकडे विचारपूस करीत असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारण्यात आले. ही धक्कादायक घटना मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली आहे. अमोल रमेश डेरे असे जखमी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रिपोर्ट नूसार निहाल हरपाल सिंग वय ३५ रा.मुंबई व मंगेश लक्ष्मण गायकवाड वय ३२ रा. रहाटणी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह संजय पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक डेरे मेदनकरवाडी येथे गस्त घालत होते. त्यावेळी एका टपरीजवळ तिघेजण संशयितपणे थांबल्याचे त्यांना दिसले.
पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता एकाने उपनिरीक्षक डेरे यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला. यामध्ये डेरे किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट पिस्तूल, मिरची स्प्रे, स्कू ड्रायव्हर असे साहित्य मिळून आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर