नांदेड, १७ ऑक्टोंबर २०२०: सध्या राज्यभरात सर्वच शाळा बंद आहेत, कोविड -१९ च्या संकटामुळे २५ मार्च पासून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी केंद्राकडून नववी ते बारावी वर्गांसाठी शाळा खुल्या करण्यात आल्या होत्या. राज्यातील चिंताजनक स्थिती पाहता राज्य सरकारने अद्यापही शाळांना परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाची मात्र सुविधा देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे देखील मुले कंटाळली आहेत. वास्तविक शाळेत हजर राहून शिक्षण घेण्याची मजा काही वेगळीच असते आणि हेच आता शालेय विद्यार्थी व्यक्त करत आहेत. नांदेडमधील लोहा तालुक्यातील मारतळा या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या संस्कृती जाधव या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्याबाबत भावनिक साद घातली आहे.
संस्कृती जाधव या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून हे भावनिक साद घातली आहे तिने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरु करा.” या शाळेत शिकवणारे शिक्षक रवी ढगे यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त पत्रलेखनाचा उपक्रम घेतला होता. ह्या उपक्रमा दरम्यान संस्कृती जाधव हिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित शाळा सुरु करण्याची मागणी केली आहे.
“आम्ही घरी बसून कंटाळलो आहोत. आम्हाला शाळेची आठवण येतेय. ऑनलाईन शिक्षण घेऊन कंटाळा आला आहे, त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुरु करा,” असे संस्कृतीने पत्रात म्हटलं आहे. सध्या संपूर्ण शाळेत तिच्या पत्राचीच चर्चा सुरु आहे. संस्कृतीच्या पत्राची चर्चा शिक्षकांसह पालकही करत आहे. या पत्रावर उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे