चिमुकल्याचा वाढदिवस कोविड सेंटर मध्ये साजरा

12

बारामती, २१ सप्टेंबर २०२०: बारामतीसह संपूर्ण देश कोरोना विषाणूशी लढा देत आहे. जो-तो मला, माझ्या कुटुंबियांना या विषाणूपासुन धोका होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. विशेषत: घरातील लहान मुलं व वृद्धांना याचा उपद्रव होऊ नये यासाठी कुटुंबातील व्यक्ती काळजी घेत आहेत. मात्र कोविडची लागण झालेल्या तीन वर्षाच्या प्रणयचा दि. २१ सप्टेंबर २०२० सोमवार कोविड सेंटर मध्ये साजरा केलेला वाढदिवस कायम आठवणीत राहील.

शहरातील नक्षत्र गार्डन विद्यानगरी येथील नटराज कोविड सेंटरमध्ये ३ वर्षाचा प्रणय कांबळे या चिमुकल्याला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तो त्याच्या कुटुंबियांसोबत कोविड सेंटरमध्ये असल्याने सर्वजण तणावात आहेत. २१ सप्टेंबर त्याचा वाढदिवस आहे, हे समजल्यावर या कोविड सेंटरचे व्यवस्थापन पाहणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष किशोर मासाळ यांना ही माहिती मिळाली. त्यांनी लगेच छानसा केक व बॅनर बनवून त्याच्या हातून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी कोविड सेंटरमधील सगळ्यांनी या चिमुकल्याला शुभेच्छा दिल्या.

वाढदिवस नटराज कोविड सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अजिज शेख, सामाजिक न्याय विभागाच्या अधिक्षिका एस.बी.खारतोडे हे यावेळी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव