बारामती, दि. ६ जुलै २०२०: कोरोना या संसर्गजन्य विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना काल बारामती शहरातील ९ ते १२ वर्षाच्या चार चिमुकल्यानी रमजान ईदला मिळालेली इदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली.
कोरोना संसर्गाच्या बिकट प्रसंगी प्रत्येक नागरिक आपापल्या परीने समाजातील वंचित घटकाला मदत करताना दिसत आहेत. मात्र बागवान कुटुंबातील या लहानग्या मुलांनी आपल्या ईदीचा वापर हा कोरोनाच्या विरोधात लढत असणाऱ्या लोकांसाठी वापर व्हावा यासाठी देत आहोत, असे सांगितल्यावर अजित पवार यांनी या मुलांच्या पाठीवर शब्बासकीची थाप दिली.आज दिवसभर याचीच बारामतीमध्ये चर्चा आहे.
बारामती शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील विकास कामांची तसेच सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या गर्दीवरील उपाययोजना करण्यासाठीची बैठक घेतली होती. यावेळी बारामती शहरातील बागवान कुटुंबातील यादगार फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव पुढे असणाऱ्या माजी नगरसेवक अमजद बागवान व फिरोज बागवान यांनी सांगितले रमजान इद मध्ये मुलांना कुटुंबातून व नातेवाईकांकडून मिळालेले ईदीचे १५ हजार रुपये जमा झाले होते. रमजान ईद होऊन बरेच दिवस झाले तरी मुलं या पैशाचे काही घेत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना याबाबत विचारले असता हे पैसे आपल्या देशातील कोरोना संसर्गाशी लढत असलेल्या लोकांसाठी देणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला असता या ९ ते १२ वर्षे वय असणाऱ्या मुलांनी ही रक्कम विद्याप्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सुपूर्द केली.
यावेळी पवार यांनी जिशान फिरोज बागवान,मलिक अमजद बागवान,फरहान फिरोज बागवान व अमन अमजद बागवान या चिमुकल्यांचे कौतुक करत त्यांच्यातील असणाऱ्या सामाजिक जाणिवेला बघून गाडीतील खायचा बॉक्स मुलांना दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव