एलएसीवर चीननं मोठ्या प्रमाणावर जमवले सैन्य आणि दारुगोळा: राजनाथ सिंह

8

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२०: वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) परिस्थिती तणावपूर्ण आहे. एलएसीची परिस्थिती वर्णन करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं की आतापर्यंत चीननं एलएसी आणि अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि दारू गोळा साठवलाय. भारतीय सैन्यानंही पूर्ण तयारी केलीय.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “सीमा भागातील शांतता आणि सौहार्दासाठी एल.ए.सी. चा आदर आणि काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे आणि हेच १९९३ व १९९६ च्या करारामध्ये स्पष्टपणे मान्य केलं गेेलं आहे, भारतीय सैन्य या कराराचं पूर्णपणे पालन करत आहे मात्र, चिनी सैन्य असं करताना दिसत नाही.”

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, “आतापर्यंत चीननं एलएसी आणि अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात सैन्य आणि दारुगोळा गोळा केलाय. पूर्व लडाख आणि गोगरा, कोंगला का आणि पँगोंग तलावाच्या उत्तर व दक्षिण किनारपट्टीवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. चिनी सैन्याच्या तैनाती पाहता भारतीय सैन्याने देखील आपली तैनात वाढविली आहे.”

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “आपले सैन्य या लढाईला यशस्वीरित्या सामोरे जाईल आणि सभागृहातील सदस्यांना देखील यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पूर्ण देशाला आपल्या सैन्यावर गर्व आहे. अजून देखील सीमेवर संवेदनशील स्थिती कायम आहे. त्यामुळं तेथील काही माहिती देणं मी टाळत आहे.”

राजनाथ सिंह म्हणाले की, “या सभागृहाची एक वैभवशाली परंपरा आहे की जेव्हा जेव्हा देशापुढं मोठं आव्हान आलंय तेव्हा या सभागृहानं भारतीय सैन्याच्या दृढनिश्चय आणि शौर्यावर पूर्ण ऐक्य व विश्वास दर्शविला आहे. मी आपल्याला खात्री देतो की आमच्या सैनिकांचा उत्साह आणि धैर्य मजबूत आहे.”

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “यंदाची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे, तरीही आम्ही सध्याच्या परिस्थितीचा शांततेनं तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहोत. यासह मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही सर्व परिस्थितींचा सामना करण्यास तयार आहोत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा