नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२२: भारताच्या राफेल विमानांशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानला चिनी J-10C फायटर जेटची दुसरी खेप मिळाली आहे. हे सध्या पाकिस्तानी लष्कराकडे असलेल्या सर्वात मजबूत शस्त्रांपैकी एक आहे. मार्च महिन्यात पाकिस्तानला चीनकडून पहिली खेप मिळाली होती, ज्यामध्ये ६ लढाऊ विमानांचा समावेश होता. त्यानंतर आता दुसऱ्या खेपेत आणखी ६ लढाऊ विमाने मिळाल्यानंतर त्यांची संख्या पाकिस्तानमध्ये १२ झाली आहे.
जून २०२१ मध्ये, पाकिस्तान आणि चीनने लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत करार केला. सुमारे ६ महिन्यांनंतर, डिसेंबर २०२१ मध्ये, पाकिस्तान सरकारने घोषित केले की २५ J-10C लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी चीनशी करार करण्यात आला आहे.
चीनचे हे फायटर जेट पाकिस्तानी हवाई दलाचे सामर्थ्य तर वाढवेलच, शिवाय पाकिस्तानला सुरक्षा उपकरणांच्या प्रगत तंत्रज्ञानाकडे घेऊन जाईल. राफेल मिळाल्यानंतर भारत या तंत्रज्ञानाने सज्ज झाला होता, मात्र आता J-10C मिळाल्यानंतर पाकिस्तानचे नावही या यादीत सामील झालंय. J-10C विमानाचे स्वागत करताना पाकिस्तानी लष्कराने आपल्या सुरक्षा ताफ्यात सामील झाल्याचा अभिमान व्यक्त करताना हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगितलंय.
सुदानही चीनकडून हे लढाऊ विमान खरेदी करण्याच्या तयारीत
विशेष म्हणजे पाकिस्ताननंतर आता सुदानही चीनकडून J-10C लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे. चीनचा सुदानसोबतचा करार पक्का झाल्यास चीनकडून ही विमानं खरेदी करणारा सुदान हा पाकिस्ताननंतरचा दुसरा देश ठरंल.
पहिली खेप मिळाल्यानंतर इम्रान खान यांनी जगाला संदेश दिला
मार्च महिन्यात जेव्हा चीनकडून लढाऊ विमानांची पहिली खेप आली, त्यावेळी पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार चालू होतं. J-10C विमानांची खेप मिळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, आता कोणत्याही देशाला पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागेल. इम्रान खान म्हणाले होते की, पाकिस्तानचं सैन्यदल कोणत्याही धोक्याला पराभूत करण्यासाठी सुसज्ज आणि प्रशिक्षित आहे.
भारताचे राफेल आणि पाकिस्तानचे J-10C यात काय फरक?
भारताची राफेल आणि पाकिस्तानची J-10C विमानं, दोन्ही लढाऊ विमानं 4.5 जनरेशनची आहेत. जेथे राफेलमध्ये उच्च श्रेणीच्या क्षेपणास्त्राची क्षमता आहे ज्यामध्ये जगातील सर्वात धोकादायक मीका आणि आयआयआर इमेजिंग इन्फ्रारेड क्षेपणास्त्र लोड केलं जाऊ शकते. तर पाकिस्तानला दिलेल्या J-10C मध्ये कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता आहे, ज्यामध्ये फक्त PL-8/9 सारखी क्षेपणास्त्रं लोड करता येतात.
पाकिस्तानचं J-10C विमान आणि भारताचं राफेल यातील सर्वात मोठा फरक हा नक्कीच अनुभव आहे. खरं तर, राफेलचा वापर इराक, सीरिया, अफगाणिस्तान, लिबिया आणि मालीमध्ये लढाऊ कारवायांमध्ये केला गेलाय, तर J-10C ला हा अनुभव नाही.
दुसरीकडं राफेलची मारक क्षमता जास्त आहे, तर J-10C ची मारक क्षमता कमी आहे. राफेलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातून आण्विक क्षेपणास्त्रं देखील डागली जाऊ शकतात, तर J-10C मध्ये हे वैशिष्ट्य नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे