नवी दिल्ली, २७ एप्रिल २०२१: भारतात कोरोना साथीच्या उद्रेकात चीननं पुन्हा एकदा मदतीची ऑफर दिली आहे. चीननं सोमवारी भारतातील कोरोना साथीच्या गंभीर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ते मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी ट्वीट केलं की, “आम्हाला भारतातील गंभीर परिस्थितीची चिंता आहे. जर भारत आम्हाला आपल्या गरजा सांगत असेल तर आम्ही मदतीला तयार आहोत.”
गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची तीन लाखाहून अधिक प्रकरणं भारतात येत आहेत. भारतातील कोरोना साथीच्या आजारामुळं परिस्थिती इतकी भयानक बनली आहे की कोविड रूग्णांना रूग्णालयातही बेड मिळत नाही. रूग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं बरेच रुग्ण मरत आहेत. लोकांना त्यांच्या नातलगांच्या अंतिम संस्कारासाठी देखील वाट पाहावी लागत आहे.
भारतातील कोरोना संकट पाहता अमेरिका, सौदी अरेबिया, जर्मनीसह अनेक देश मदतीसाठी पुढं आले आहेत. भारताचे चिनी राजदूत सन वेदोंग यांनीही भारताला पाठिंबा देण्याविषयी बोललं आहे. त्यांनी ट्विट केलं की, कोरोनाविरूद्धच्या लढाईत चीन भारताचे जोरदार समर्थन करतो. आम्ही चिनी कंपन्यांना भारताला आवश्यक वैद्यकीय पुरवठा करण्यास सहकार्य करण्यास प्रोत्साहित करू.
मीडिया रिपोर्टनुसार चीनच्या सिचुआन एअरलाइन्सनं कोविडच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांसाठी भारतातील मालवाहू उड्डाणे रद्द केली आहेत. या उड्डाणांच्या माध्यमातून भारतातील खाजगी कंपन्या चीनमधील ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरसह अनेक महत्त्वाची वैद्यकीय साधनं मागवतात. परंतु उड्डाणं रद्द केल्यानं चीनकडून भारताला वैद्यकीय उत्पादनांच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांना विचारलं असता ते म्हणाले की, “भारतातील खासगी कंपन्यांकडून वैद्यकीय उत्पादनांची आयात सामान्य व्यवसायात केली जाते.” जर वैद्यकीय उत्पादनांच्या पुरवठ्यासाठी भारत स्वतंत्रपणे विनंती करत असेल तर आम्ही मदतीसाठी तयार आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे