पुणे, 8 जानेवारी 2022: चीनने ‘कृत्रिम सूर्य’ तयार केलाय. हे तुम्हाला माहित असलंच पाहिजे. हा सूर्य सतत उच्च तापमान दाखवत असतो. ते बनवण्याचा उद्देश स्वच्छ ऊर्जेच्या रूपाने चीनच्या ऊर्जा गरजा पूर्ण करणं हा आहे. अलीकडंच या बनावट सूर्याने खऱ्या सूर्यापेक्षा पाचपट जास्त तापमान गाठलं. तेही 17 मिनिटांसाठी. आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ उष्णता निर्मितीचे हे पहिलंच प्रात्यक्षिक आहे.
या बनावट सूर्याचं नाव EAST (Experimental Advanced Superconducting Tokamak – EAST) आहे. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते, अलीकडेच 1056 सेकंदांसाठी 7 कोटी अंश सेल्सिअस तापमान राखलं गेलं. जे सूर्याच्या तापमानापेक्षा पाचपट जास्त आहे. हे तापमान दीर्घकाळ टिकवून ठेवल्यास त्यातून निर्माण होणारी वीज देशाचा मोठा भाग उजळून टाकू शकेल.
यापूर्वी मे 2021 मध्ये या ‘कृत्रिम सूर्या’ने 101 सेकंदांसाठी 120 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान निर्माण केलं होतं. पण त्याची वेळ फारच कमी होती. वास्तविक सूर्याच्या केंद्रस्थानी तापमान सुमारे 1.5 कोटी अंश सेल्सिअस आहे. पण, चीनच्या कृत्रिम सूर्याने दोन्ही वेळा खऱ्या सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त कामगिरी केली आहे. आता त्यातून ऊर्जा घेऊन ती संपूर्ण चीनमध्ये पुरवण्याचे काम सुरू आहे.
चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा फिजिक्सचे संशोधक आणि या प्रयोगाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ गोंग जिआनजू म्हणाले की, नुकत्याच झालेल्या चाचणीने मजबूत वैज्ञानिक डेटा दिलाय. याच्या आधारे आपण दीर्घकाळ चालवून ऊर्जा निर्माण करू शकतो. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून न्यूक्लियर फ्यूजनमधून ऊर्जा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
अत्यंत दाब आणि तापमानात हायड्रोजनच्या अणू कणांना एकत्र करून हेलियम तयार करण्याची प्रक्रिया या कृत्रिम सूर्यामध्ये केली जात आहे. हीच प्रक्रिया आपल्या सूर्यामध्येही घडते. येथून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे रूपांतर प्रकाश आणि उष्णतेमध्ये होते. या प्रक्रियेद्वारे, आपण दीर्घकाळ ऊर्जा मिळवू शकतो, ती देखील हरितगृह वायू किंवा किरणोत्सर्गी कचरा उत्सर्जन न करता.
EAST (Experimental Advanced Superconducting Tokamak) सुपरहिटिंग प्लाझ्मावर कार्य करते. म्हणजेच, पदार्थाच्या चार स्वरूपांपैकी एकाचे पॉजिटिव आयन आणि उच्च उर्जेने भरलेले मुक्त इलेक्ट्रॉन डोनट-आकाराच्या रिअॅक्टर चेंबरमध्ये ठेवून वेगानं फिरवले जातात. ज्यामुळं चुंबकीय शक्तीचा एक अद्भुत स्तर तयार होतो. ही खूप अवघड प्रक्रिया आहे.
पहिले टोकमाक 1958 मध्ये सोव्हिएत शास्त्रज्ञ नॅटन याव्हलिंस्की यांनी तयार केले होते. पण, त्या काळानंतर अनेक वर्षे टोकामॅक वापरण्याचे धाडस कोणी केलं नाही. शेनझेनमधील दक्षिणी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संचालक ली मियाओ यांच्या मते, चीनने शेवटच्या वेळी ही चाचणी घेतली होती, त्यानुसार अणुभट्टी आठवडाभर स्थिर तापमानावर चालवणे हे पुढील ध्येय असू शकतं. मात्र यावेळी तसे होऊ शकले नाही.
चीनच्या पूर्व अनहुई प्रांतात असलेल्या या अणुभट्टीला प्रचंड उष्णता आणि शक्तीमुळं ‘कृत्रिम सूर्य’ म्हटले जाते. गेल्या वर्षाच्या अखेरीस ते तयार करण्यात आले. चीनी शास्त्रज्ञ 2006 पासून न्यूक्लियर फ्यूजन अणुभट्टीच्या छोट्या आवृत्त्या विकसित करण्यावर काम करत आहेत.
जगातील सर्वात मोठा न्यूक्लियर फ्यूजन संशोधन प्रकल्पही फ्रान्समध्ये सुरू आहे, जो 2025 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, दक्षिण कोरियाकडे स्वतःचा ‘कृत्रिम सूर्य’, कोरिया सुपरकंडक्टिंग टोकमाक अॅडव्हान्स्ड रिसर्च (KSTAR) आहे, जो 20 सेकंदांसाठी 100 दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान राखण्यात यशस्वी ठरला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे