Temple Dress Code Implementation in Chinchwad: आता मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाताना तुम्हाला तुमच्या पोशाखाकडे लक्ष द्यावे लागणार आहे! चिंचवड देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून,त्यांच्या अखत्यारीतील तब्बल पाच मंदिरांमध्ये प्रवेशासाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना आता मंदिराच्या पावित्र्यानुसार आणि परंपरेनुसारच वेशभूषा करून या मंदिरांमध्ये प्रवेश करावा लागणार आहे.
पाच प्रमुख मंदिरांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टची पारंपरिक वस्त्रसंहिता लागू;


ट्रस्टने याबाबत एक पत्रक जारी केले असून, त्यात या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. या वस्त्रसंहितेमुळे अष्टविनायकातील महत्त्वाची मंदिरे, जसे की मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांचा समावेश आहे. यासोबतच चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवनी मंदिर आणि खार नारंगी मंदिर या दोन मंदिरांसाठी देखील हा नियम लागू असेल. ही पाचही देवस्थाने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापनाखाली येतात. मंदिरांचे पावित्र्य जपले जावे आणि एक भक्तिमय वातावरण टिकून राहावे, या उद्देशानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांना नम्र विनंती केली आहे की, महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्तीवाडा या केवळ वास्तू नसून, त्या श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचे केंद्र आहेत. या पवित्र स्थळांना भेट देणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पावित्र्याचा आदर करणे आणि येथील भक्तिपूर्ण वातावरण कायम राखण्यासाठी सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. आपली वेशभूषा आणि वर्तन हे मंदिराच्या शुद्धतेला अनुरूप असावे, यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
या पत्रकात मंदिर प्रवेशासाठी पोशाखासंबंधी स्पष्ट नियम नमूद करण्यात आले आहेत. त्यानुसार, पुरुषांनी दर्शनासाठी येताना पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. यामध्ये शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर, कुर्ता पायजमा यांसारख्या मंदिराच्या पावित्र्याला साजेसा वेशभूषेचा समावेश असेल. त्याचप्रमाणे, महिलांसाठी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा इतर कोणत्याही पारंपरिक पोशाखाची निवड करता येणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाविकांनी मंदिराच्या पावित्र्याला अनुकूल आणि आदरयुक्त वाटेल असाच पोशाख परिधान करणे बंधनकारक असेल. ट्रस्टने स्पष्टपणे सांगितले आहे की, अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके किंवा शरीराचे प्रदर्शन करणारे कोणतेही अनौपचारिक कपडे मंदिर परिसरात घालण्यास सक्त मनाई असेल.
चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, मंदार देव यांनी सांगितले की, मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भाविकांनी अंगप्रदर्शन होणार नाही आणि योग्य पद्धतीची पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे, यापुढे या पाच मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाताना आपल्या वस्त्रांची निवड अधिक विचारपूर्वक करावी लागणार आहे!
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे