ऐन थंडीच्या दिवसांत उकाड्याने नागरिक त्रस्त

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२ : राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे थंडीच्या हंगामात उकाड्याचा अनुभव येत असून, महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. सरासरीच्या तुलनेत रात्रीचे किमान तापमान सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील तीन-चार दिवस अशा स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

उत्तरेकडे थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि निरभ्र आकाश तसेच कोरडे हवामानाच्या स्थितीमुळे २० आणि २१ नोव्हेंबरला राज्यात सर्वच भागांतील तापमान नीचांकी पातळीवरील गेले होते. परिणामी थंडीचा काडाका वाढला होता; मात्र बंगालचा उपसागर आणि त्यापाठोपाठ अरबी समुद्रातील वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली. परिणामी समुद्रातून बाष्प येऊ लागले. त्यातून दक्षिणेकडील राज्यात पावसाळी वातावरण तयार होऊन केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यांत आणि आजूबाजूच्या भागांत पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रात थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आणि कोकण, मध्य महाराष्ट्र बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार होऊन तापमानात वाढ झाली.

हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने पुणेकर सुखावले असतानाच अचानक वाढलेल्या तापमानाने थंडी गायब झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पारा चढत असल्यामुळे ऐन थंडीत उकाडा वाढला आहे. विशेषतः सकाळी किमान तापमान २१; तर सायंकाळ होताच २९ अंशांवर पोचत आहे. त्यात ढगाळ वातावरणाची भर पडत आहे. त्यामुळे सकाळी थंडी आणि सायंकाळी उकाडा अशा विचित्र हवामानाचा अनुभव सध्या नागरिक घेत आहेत.

ऑक्टोबर ते जानेवारी हा साधारण हिवाळा ऋतू मानला जातो; पण गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गचक्र बदलले असल्याचा अनुभव यावर्षीही आला. ऐन ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये पाऊस सुरू होता. ता. २५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत होता; मात्र त्यानंतर पावसाने परतीचा मार्ग घेतला आणि थंडीची चाहूल लागली. पूर्वेकडील गार वाऱ्यांमुळे राज्यात थंडीने प्रवेश केला होता. त्यामुळे दिवाळीनंतर तापमानातही घसरण सुरू झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात यावर्षीतील आतापर्यंतच्या सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यापर्यंत हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येत होता; पण गेल्या चार दिवसांपासून पुन्हा वातावरणात बदल जाणवू लागला आहे. सकाळी किंचित थंडी आणि सायंकाळ होताच वाढता उकाडा असे हवामान सध्या सर्वत्रच झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हा बदल झाल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तापमानाचे गणित बिघडले असून, ता. २१ नोव्हेंबरपासून सकाळच्या तापमानात वाढ होऊन पारा सायंकाळच्या सुमारास पुन्हा २८ अशांच्या पुढे तापमानाची नोंद होत असल्याचे राज्यातील प्रमुख शहरांतील आजच्या तापमानावरून दिसून येते.

राज्यातील प्रमुख शहरांचे हवामान (डिग्री सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे :
१) मुंबई (कुलाबा) : किमान २५, कमाल २९
२) ठाणे : किमान २५, कमाल ३०
३) नाशिक : किमान २२, कमाल २८
४) पुणे : किमान २१, कमाल २६
५) औरंगाबाद : किमान २२, कमाल २८
६) नांदेड : किमान २२, कमाल २९
७) नागपूर : किमान २४, कमाल ३१
८) रत्नागिरी : किमान २३, कमाल २८
९) सातारा : किमान २३, कमाल २९
१०) कोल्हापूर : किमान २२, कमाल २७
११) सोलापूर : किमान २१, कमाल ३१

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा