इंदापूर, दि. १६ मे २०२०: कोरोनामुळे जगभरासह महाराष्ट्रामध्ये देखील थैमान घातले असून सध्या इंदापूर तालुक्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवल्यामुळे इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. इंदापूर तालुक्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे बाहेरून इंदापूर तालुक्यात येणाऱ्या नागरिकांचे सक्तीने विलगीकरण करण्याचे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीमध्ये दिले.
तसेच इंदापूर मध्ये तीन स्वैब टेस्टिंग सेंटर साठी मान्यता मिळाली असल्याचे सांगितले. यामध्ये इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, भिगवण आणि उपजिल्हा रुग्णालय इंदापूर याठिकाणी टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच इंदापुर मध्ये आपल्याकडे कोणी नातेवाईक किंवा कोणी आला असल्यास प्रशासनाला ताबडतोब कळवावी जेणेकरून त्याची दखल घेतली जाईल तसेच कोणीही हुज्जत घालत बसू नये असे देखील भरणे यांनी यावेळी सांगितले.
आतापर्यंत इंदापूर मध्ये एकही कोरोना रुग्ण न सापडल्यामुळे त्यांनी प्रशासनाचे आभार मानले. यापुढे देखील असेच सहकार्य करण्याचे सर्व नागरिकांना आवाहन देखील केले.
यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, सार्वजनिक बांधकाम अभियंता धनंजय वैद्य, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, नागरपरिषदेचे मुख्य अधिकारी प्रदीप ठेंगल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ.लक्ष्मण मोरे, भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए .एस. पवार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफने, व्ही.एम.सुळ आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे