बरामती शहरातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे

बारामती, ४ सप्टेंबर २०२० : बारामती शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.सिल्व्हर जुबली हॉस्पिटलच्या बाहेर रोज स्वैब देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत.रोज सकाळी कोरोना संसर्गाची लागण झाल्याचा मोठा आकडा बारामतीकरांच्या हृदयाचा ठोका चुकवत असला तरी बारामतीकर शासनाचे कोणतेही नियम पाळत नसल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. शहराचे क्षेत्रफळ वाढल्याने शासनाच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या बिकट प्रसंगी देखील काही नागरिक खोटे बोलून गैरफायदा घेत असल्याचे अनेक प्रसंगी समोर आले आहेत.

बारामती शहरातील कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.शहरात अनेक ठिकाणी खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.बारामती शहर रोज सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू असताना देखील भाजीमंडई , मेडिकल ,खाद्यपदार्थ, कापड दुकान,मोबाईल दुकान,सराफ व्यावसायिक येथे मोठी गर्दी पहावयास मिळते आहे.जणू काही कोरोना संसर्गाची काही भीतीच नाही असे नागरिक वावरताना दिसत आहेत. शहरात मोठ्या संख्येने आसपासच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी येत असल्याने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.मुख्य बाजारपेठेतील मोठ्या व्यापाऱ्यांकडे कामगारांची संख्या जास्त आहे.दुकानदाराने जरी शासनाच्या नियमाप्रमाणे काळजी घेतली असली तरी ग्राहकाला वस्तू दाखवताना सोशल डिस्टन्स किंवा खबरदारी घेतली जात नसल्याचे पहावयास मिळते आहे.

तसेच शहरातील भाडे तत्वावर प्रवासी वाहणारी वाहने भरून वाहत आहेत.यामध्ये देखील कोणत्या भागातील प्रवासी आहेत याची माहीती नाही त्यामुळे येथे शासनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घरी आरोग्य अधिकारी अैम्बूलन्स घेऊन गेल्यावर हा रुग्ण एका हॉटेल मध्ये जेवत बसल्याचे ही सांगण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाच्या तपासणी साठी घेतलेल्या स्वैबमध्ये मोठ्या चुका असून अनेक रुग्णाची नावं चुकल्यानेही मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.तर अनेक बाहेरच्या तालुक्यातील रुग्णांनी बारामतीतील चुकीचा पत्ता देऊन स्वतःवर उपचार करून घेतले असून जेव्हा शासनाचे कर्मचारी त्या पत्त्यावर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद करायला जातात तेव्हा, तेथे दुसरेच लोक राहत असल्याचा अनुभव देखील कर्मचा-यांना आले आहेत. तर काही बारामतीतील नागरिकांनी आपण कोरोना ग्रस्त आहोत याचा अपमान वाटुन खोटा पत्ता सांगितला आहे.

सध्या स्वैब दिलेले लोक हे आम्ही होम कॉरंन्टीन होतो असे सरकारी हॉस्पिटलमध्ये सांगतात आणि बाहेर फिरताना तसेच खरेदीसाठी आलेले दिसतात यामुळे, दुसऱ्या नागरिकांना याची मोठ्या प्रमाणावर बाधा होऊन शहरातील रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना बाधीत रुग्णाने स्वतःला कॉरंन्टीन करून कोणाच्या संपर्कात येऊ नये. बाहेरील जिल्ह्यातील व तालुक्यातील चारचाकी वाहने देखील मोठ्या संख्येने शहरात वावरताना आढळत आहेत या वाहनांवर निर्बंध आणणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा