साताळा येथील खडी क्रशरविरोधात नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन पोलिसांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

औरंगाबाद, १४ फेब्रुवारी २०२३ : साताळा (ता. फुलंब्री) येथील खडी क्रशरमुळे त्रस्त नागरिकांनी मंगळवारी (ता. १४) सकाळी औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. खडी क्रशरमुळे होणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे साताळा येथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेला फुफ्फुसाचे आजार होत असून, सामान्य लोकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

या रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे; मात्र पुढील आठ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास फुलंब्री तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आसल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यातील साताळा गावामधील खडी क्रशरची सखोल चौकशी करून खडी क्रशरसाठी लागणारी सर्व परवानगी, रॉयल्टी व संबंधित सर्व विभागांची परवानगी; तसेच आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांची संमती या सर्व बाबींची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधी मा. बांधकाम सभापती व खडी क्रशरचे मालक याकडे काणाडोळा करून तालुका प्रशासनाला हाताशी धरून गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. त्यामुळे येथील जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद-जळगाव महामार्गवर असलेल्या या खडी क्रशरमुळे आठ दिवसांतून एक अपघात होत आहे. वाहतुकीमुळे वारंवार केलेले रस्त्याचे डांबरीकरणही सतत उखडून जात आहे. रस्त्याच्या विचित्र अवस्थेमुळे व सकाळ-संध्याकाळच्या वेळी विनाकारण व नियमापेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिकांना अपघातास समोरे जावे लागत आहे. या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी एका तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला; तसेच एका तरुणाचा भीषण अपघात होऊन त्याच्या डोक्याला मार लागला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा