सोशल मीडियावर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तक्रार करावी

बारामती , दि. ७ जुलै २०२०: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन शासनातर्फे केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. मोकळा वेळ असल्याने या काळात सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यानच्या काळात सोशल मीडियावर अनेक नवनवीन लोकांच्या ओळखी देखील झाल्या आहेत. याचा फटका काही लोकांना बसला आहे. अशा लोकांनी पोलिसांकडे तक्रार द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यावर नाईलाजास्तव नागरिकांना घरात थांबावे लागत आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर होतो आहे. यातूनच नवनवीन ओळखी होऊन तरुण -तरुणींनी एकमेकांना फोटो शेअर करणे, बँक खात्याची माहिती, पासवर्ड, पिन नंबर देणे, आर्थिक फसवणूक करणे तसेच फोटो एडीट करून महिलांना धमकवणे, पैसे मागणे, शारिरीक संबंधाची मागणी करणे यांसारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

वृद्ध लोकांना फोन करून त्यांच्या कडून एटीएम कार्डचा नंबर मिळवून फसवणूक करणे अशा प्रकारचे बारामती तालुका आणि शहर येथे गुन्हे दाखल असून या प्रकरणी आरोपीला अटक देखील केली आहे. सोशल मीडियाचा वापर सुरक्षितपणे मर्यादित करावा असे शिरगावकर म्हणाले.

जर अशा प्रकारचे गुन्हे आपल्या बाबतीत अथवा आपल्या आसपास घडले असतील तर त्या लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार दाखल करावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:  अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा