Expensive Cherry Pimpri-Chinchwad: लालबुंद आणि आंबट-गोड चवीची चेरी सध्या पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात आणि ताटातही भाव खात आहे! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं हे फळ सध्या विमानातून दाखल होत असून, त्याचे दर गगनाला भिडले आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीरमधून येणाऱ्या या फळाला शहरात मोठी मागणी आहे, पण यंदा काश्मीरमधील तणाव आणि पावसामुळे आवकेवर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे दरांवरही याचा परिणाम दिसून येत आहे.
सध्या पिंपरी फळ बाजार आणि शहराच्या विविध भागांमध्ये दररोज सुमारे दीड हजार बॉक्स चेरीची आवक होत आहे. प्रत्येक बॉक्समध्ये १ ते २ किलो चेरी असते, जी किरकोळ विक्रेत्यांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचते. परंतु, काश्मीरमधून येणारी आवक कमी झाल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे.

चेरीची लागवड प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातील शिमला, कुल्लू आणि पठाणकोटच्या थंड हवामानात होते. पठाणकोटची चेरी रंगाने गडद आणि चवीने आंबट-गोड असते. मात्र, काश्मीरमधून येणारी चेरी तिच्या गोड चवीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने, भारत-पाक सीमेवरील तणाव आणि पावसामुळे काश्मीरमधील चेरीची आवक यंदा उशिरा होत आहे.
सध्या किरकोळ बाजारात चेरीचा भाव ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचला आहे, तर उच्च दर्जाची चेरी ६०० रुपये किलोपर्यंतही विकली जात आहे. फळविक्रेत्यांच्या मते, काश्मीरमधून चेरीची आवक वाढल्यास दर खाली येऊ शकतात. फळविक्रेते कुमार शिरसाट यांनी सांगितले की, “चेरीच्या व्हेलवेट, मखमल, मिसरी या व्हरायटी असून सध्या ३०० ते ७०० रुपये किलो चेरीचा दर आहे. साधारण २० जूनपासून आवक वाढल्यास १५० रुपये किलोपर्यंत दर खाली येऊ शकतात. सध्या विमानाने येणारी चेरी महाग असून रस्त्याने आवक वाढेल, त्यावेळी किमती कमी होतील. रविवारी आयटीयन्सकडून चेरीला मोठी मागणी असते.”
लहान मुलांचे आवडते फळ असलेली चेरी केवळ तिच्या आकर्षक रंगामुळे आणि चवीमुळेच नाही, तर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांब











































