Electrical safety during rain Maharashtra: सध्या शहरी आणि ग्रामीण भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरण विभागाने नागरिकांना विजेच्या धोक्यांपासून अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाणी हे विजेचे उत्तम वाहक असल्याने, पावसाळ्यात रस्त्यांवरील सार्वजनिक वीज यंत्रणा, पथदिव्यांचे लोखंडी खांब आणि घरातील विद्युत उपकरणांपासून विशेष सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे अनेकदा विजेच्या तारा तुटतात, खांब वाकतात किंवा पथदिवे निकामी होतात. रस्त्याच्या कडेला असलेले फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आणि विद्युत यंत्रणेजवळील ओलसर वस्तू किंवा साहित्यामुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे, अशा कोणत्याही वस्तूंना थेट स्पर्श करणे टाळावे.
सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना;
- आपल्या घरातील किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करा.
- ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवणे कटाक्षाने टाळा.
- विजेचे स्वीच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची विशेष काळजी घ्या.
- घरातील स्वीच बोर्ड आणि इतर विद्युत उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्या.
- फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ‘अॅल्युमिनियम अलॉय’ या विशिष्ट धातूच्या तारेचाच वापर करा.
- मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे किंवा फांद्या वीजतारांवर पडू शकतात, ज्यामुळे तारा तुटून लोंबकळू शकतात. अशा तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या तारांमध्ये वीजप्रवाह असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, अशा तारांपासून दूर राहा आणि त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका.
महावितरणने नागरिकांना आवाहन केले आहे की, तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या वीजतारा दिसल्यास त्वरित स्थानिक महावितरण कार्यालयात माहिती द्यावी. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































