Pimpri Chinchwad Cyber Police Fraud Arrest: मौजमजेसाठी बनावट कागदपत्रे तयार करून वेगवेगळ्या बँकांकडून तब्बल ५१ लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या एका सराईत संशयिताला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्याकडून बनावट कर्ज प्रकरणांसाठी तयार केलेल्या आणखी २० फायली जप्त करण्यात आल्या असून, या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युवराज भरत तिवडे (रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील एका बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याची गोपनीय माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले असता, एक व्यक्ती वेगवेगळ्या नावांनी बँकांकडून कर्ज घेत असल्याचे निष्पन्न झाले. हा संशयित आपले पत्ता आणि मोबाइल नंबर वेळोवेळी बदलत असल्याने पोलिसांना त्याला शोधणे आव्हानात्मक ठरले.
सायबर पोलिसांनी कसून तपास करत मोशी टोलनाका येथे सापळा रचून युवराज तिवडेला अटक केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत खोटी नावे सांगितली. मात्र, सखोल चौकशीअंती त्याचे खरे नाव उघड झाले. युवराज तिवडे सायबर कॅफेमध्ये जाऊन संगणकीय डेटा वापरून पॅनकार्ड नंबरच्या आधारे कस्टमर केअरशी संपर्क साधायचा आणि त्या पॅनकार्डवर आधार क्रमांक मिळवत असे. त्यानंतर, त्या आधार क्रमांकाचा वापर करून तो बनावट आधारकार्ड तयार करत होता. याच बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे तो बँकेतून कर्जे घेत असे.
आतापर्यंतच्या तपासात, युवराजने चिंचवड येथील एका व्यक्तीच्या नावाने १८ लाख रुपये, तर अन्य दोन व्यक्तींच्या नावाने प्रत्येकी १८ लाख आणि १५ लाख रुपयांचे, असे एकूण ५१ लाखांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या २० बनावट फायलींमध्ये आणखी अनेक बोगस कर्ज प्रकरणांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, प्रवीण स्वामी, प्रकाश कातकाडे, अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करून बँकांना फसवणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे











































