पुणे, दि. ८ मे २०२०: पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित क्षेत्र व संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे गरजेची कामे करणे नागरिकांना अवघड झाले आहे. बँका, पेन्शन,शैक्षणिक अशा विविध कारणांसाठी जन्म-मृत्यू दाखला आवश्यक असतो. जन्म-मृत्यू दाखला नसल्यामुळे अशा कामांमध्ये नागरिकांना अडचण येत आहेत.
तसेच नागरी सुविधा केंद्रातून असे दाखले मिळणे १ एप्रिल २०२० पासून बंद झालेले आहे. अतिशय महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला आवश्यक असल्यास आता पुणे महानगरपालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी कार्यालय, कसबा पेठ येथील कार्यालयातून इ- मेल द्वारे स्कँन कॉपी देण्यात येणार आहे.
त्यासाठी संबंधित नागरिकांनी आपला विनंती अर्ज birthdeathpmc@gmail.com या इ-मेलवर सादर करावा. विनंती अर्ज मराठी अथवा इंग्रजी अथवा हिंदी भाषेत करावा. अर्जामध्ये आपले नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, दाखला कोणत्या आवश्यक कामाकरिता पाहिजे आहे, त्याबाबतचा उल्लेख करावा व अर्जात सुवाच्च व स्पष्ट शब्दात इ- मेल चा उल्लेख करावा. सदरचा अर्ज- मा. निबंधक तथा आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, यांच्या नावे इ – मेलवर पाठविण्यात यावा. अर्जात ज्या कारणास्तव दाखला मागणी केलेली आहे त्यासंदर्भातील कागदपत्रे पुराव्याकरिता सादर करणे आवश्यक असणार आहे.
अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन दोन दिवसात अर्जात नमूद केलेल्या केलेल्या इ -मेलवर आयडीवर स्कॅन केलेली कॉपी पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ०२० २५५०८४०८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आरोग्यप्रमुख डॉ.रामचंद्र हंकारे यांनी कळविले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: