आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ

नागपूर, २७ ऑक्टोंबर २०२२: आमदार रवी राणा आणि बच्चू कडूंमधला वाद आता टोकाला पोहोचला आहे, रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू असा थेट इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. जर राणांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाही तर अन्यथा मी मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बच्चू कडू म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.

तसेच हे बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले ७ ते ८ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे. राणा यांनी जे आरोप केले, त्याची सत्यता सांगा अशी नोटीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असून त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आम्ही सर्व आमदार १ नोव्हेंबरला आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

रवी राणा यांचे आरोप काय

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे, तसेच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला आहे.

तसेच या सर्व प्रकरणावर आमदार रवी राणा म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. कोण काय अल्टिमेटम देते याकडे मी लक्ष देत नाही. जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलावतील, तेव्हा अर्ध्या रात्री त्यांच्याकडे जाईल. ते जे सांगतील त्याचे पालन करीन, असे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.

राणांनी केलेले आरोप एकटय़ा बच्चू कडूवर नाही, तर त्यामुळे जे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर सत्ता स्थापनेत सहभागी झाले. त्या ५० आमदारांवर आहे. त्यामुळे या सर्व आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या आरोपांमुळे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एकंदरीतच या लोकांना पैसे देऊन आमदारांना गुवाहटीला नेले, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात १ नोव्हेंबरला बच्चू कडू कोणता धमाका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा