अमळनेर शहरात दोन गटात हाणामारी, दगडफेक, शहरात दोन दिवस संचारबंदी लागू

अमळनेर, १० जून २०२३ : सध्या राज्यातील अनेक भागात तणावाचे वातावरण असून आज वादग्रस्त प्रकरणामुळे धुळे शहरात देखील मोर्चा काढण्यात आला होता. अशातच अमळनेर शहरातील जिंजर गल्लीत काल रात्री दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाली. यातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यात वादग्रस्त पोस्ट आणि स्टेटस ठेवण्यामुळे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावरून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. काल रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमळनेर शहरात १० जून सकाळी ११.०० वाजल्यापासून ते १२ जून सकाळी ११.०० वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संचारबंदीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरातून बाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील एका भागात दोन तीन तरुणांमधे किरकोळ बाचाबाचीमधून हाणामारी झाली. यानंतर काही वेळात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली. हा प्रकार अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात जिंजर गल्लीसह गांधलीपुरा भागात घडला. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसाना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र यात तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह तीन ते चार नागरिकही जखमी झाले आहेत. घटनेनंतर काही वेळात पोलिसांची कुमक पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या भागात मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून येथे तणाव पूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३२ तरुणांना ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा