शासकीय गोदामातील हमालांबाबत कंत्राटी पद्धत बंद करा

मुंबई, दि. ९ जुलै २०२०: महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रतिनिधींनी आज भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ, कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांना राज्यातील शासकीय गोदामातील हमालांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन या बैठकीत सादर करण्यात आले. राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे.

हमाल मापाडी कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कामगार विभागाने सक्रीय भूमिका घ्यावी याउद्देशाने त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीस हजेरी लावली

राज्यातील अनेक भागात हमाल तोलाईदारांना काम नाकारणे, व त्यांची मजुरी आणि लेव्ही माथाडी मंडळात जमा करण्यास नकार देणे आदी प्रकार सुरू असल्याकडे महामंडळाच्या प्रतिनिधींनी सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचे लक्ष वेधले.

तिन्ही विभागाच्या मंत्रिमहोदयांनी हमाल मापाडी कामगारांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्यांबाबत सर्वंकष विचार करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा