नको नको रे पावसा…!

पावसाचे स्वागत ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’ अशा शब्दांत करणारी आपली संस्कृती; परंतु जेव्हा हा पाऊस असा धिंगाणा घालतो की जगणेच मुश्कील करून टाकतो, तेव्हा तो नकोसा होतो. महाराष्ट्रासह देशात ढगफुटीसारख्या घटना वाढत आहेत. त्यामुळे होत्याचे नव्हते होत आहे. पूर्वी अपवादात्मक असणाऱ्या ढगफुटीसारख्या घटनांची संख्या आता वाढते आहे. जीवितहानी किती झाली यापेक्षा वित्तहानी आणि मृदेची झालेली हानी फार मोठी असून, ती भरून न येणारी आहे.

गेल्या काही वर्षांपासून ढगफुटी, ढगफुटीसदृश पाऊस किंवा कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. कधी दिल्ली, कधी पुणे, कधी बेंगळुरू, कधी मुंबई अशा अनेक शहरांना ढगफुटीचा फटका बसत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला. पर्जन्यछायेखालील प्रदेशात झालेल्या ढगफुटीमुळे नद्या, नाले, ओढ्यांनी कधीच मर्यादा ओलांडली आहे.

बीड जिल्ह्यातील विंचरणा, सिंधफणा या नद्यांनी अनेकांना कवेत घेतले. जमिनी वाहून गेल्या. ज्या भागात कायम टँकर सुरू असायचे, त्या भागातील विहिरी उपळल्या. पुरात शेकडो लोक अडकले. आष्टी, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, मुखेड, सीना या तालुक्यांबरोबरच सोलापूर जिल्ह्यात जास्त हानी झाली. विदर्भ, मराठवाड्यात जानेवारीपासून झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई अजून मिळालेली नसताना ढगफुटी आणि पावसाने असा अवेळी धिंगाणा घातला. वर्षानुवर्षे प्राणपणाने जपलेल्या बागा डोळ्यादेखत वाहून गेल्या, मोडून पडल्या.

हे का घडले, कसे घडले, त्यावर उपाय काय आणि पर्वतीय प्रदेशात घडणारी ढगफुटी आता मैदानी भागात का होत आहे, याचा अभ्यास करावा लागेल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम अशा राज्यांमध्ये जलद पूर येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या मागील कारणे काय, ढगफुटी का आणि कशी होते हे जाणून घेतले पाहिजे.

राज्यात आणि देशात यापूर्वी पूर्वमोसमी पाऊस पडण्याच्या काळात, मोसमी पाऊस उत्तरेकडे वाटचाल करीत असतानाच्या काळात आणि मोसमी पाऊस देशातून माघारी जात असतानाच्या काळात ढगफुटीसदृश पाऊस पडत असे. हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर पडत नाही; स्थानिक पातळीवर चार-पाच किलोमीटरच्या परिघातच हा पाऊस पडतो.

सध्या देशभरात कमी काळात जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. जागतिक हवामान बदल, वृक्षतोड, वाढते शहरीकरण, घनदाट लोकवस्ती, वाढते प्रदूषण आदी कारणांमुळे ढगफुटीसदृश पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. सध्या मोसमी पावसाला जोर नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ढगफुटीसदृश पाऊस फार तर चार ते पाच किलोमीटर परिघातच पडतो; खूप मोठ्या परिसरात पडत नाही. अशा घटना स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे घडतात. एखाद्या गावात किंवा शहराच्या विशिष्ट भागात पडणारा पाऊस हा तेथील स्थानिक वातावरणातील संवहनी क्रियेमुळे पडतो. स्थानिक भौगोलिक रचना महत्त्वाची असते. सूर्याची उष्णता हाच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीचा पृष्ठभाग तापतो आणि जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन या उबदार, दमट वाफेचे अवकाशात ऊर्ध्वगमन होते. उंचावरील थंडाव्यातून त्याचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पाऊस पडतो. यालाच वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस किंवा ढगफुटी म्हणता येते. अनेकदा समुद्रावरून आलेल्या बाष्पाचा त्यात संयोग होऊन तो अधिक तीव्र होतो. म्हणून स्थानिक पातळीवर होणाऱ्या जोरदार पावसाला समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो.

एक ते अडीच किमी उंचीवरील ‘क्युमुलोनिंबस’ प्रकारच्या ढगांतून जर एका तासात शंभर मिलीमीटर इतका पाऊस झाला, तर ती ढगफुटी मानली जाते. गेल्या काही वर्षांत मोसमी पाऊस पडण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. संततधार पाऊस दुर्मिळ होत चालला आहे. सरासरीइतका पाऊस पडत असला तरी तो कमी काळात, कमी दिवसांत पडतो आहे.

पूर्वी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होत असे; परंतु ते नुकसान मर्यादित असे. गेल्या काही वर्षांत ढगफुटी वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या ढगफुटीमागे हवामान बदल हे एक कारण असले तरी ढगफुटी का होतात आणि त्यापासून वाचण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

हिमालयाशेजारच्या राज्यांत ढगफुटी साधारण मानली जाते; परंतु या वेळी हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड या राज्यांसह देशभरात झालेल्या ढगफुटींनी चिंता वाढवली आहे. पर्वतीय प्रदेशाबरोबरच कमी पावसाच्या आणि पर्जन्यछायेखालच्या प्रदेशातही ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत.

नगर, पाथर्डी, शेवगाव, पुणे, जामखेड, मुखेड, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात ढगफुटीच्या घटना झाल्या. नाशिक जिल्ह्यातील निफाडपासून सातारा जिल्ह्यातील माणपर्यंत, नगर जिल्ह्यातील पारनेरपासून अमरावती जिल्ह्यापर्यंत तसेच बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीपासून नांदेड जिल्ह्यातील मुखेडपर्यंत ढगफुटीने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले. आभाळ कोसळणे म्हणजे काय असते, हे या भागातील लोकांनी अनुभवले आहे.

अतिशय कमी वेळेत प्रचंड पाऊस हीच ढगफुटीची ओळख आहे. हवामान विभागाने सावधगिरीचे इशारे दिले असले तरी अतिशय कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे सावरण्याची संधी मिळाली नाही, अशी अनेक भागातील नागरिकांची स्थिती होती.

कमी काळातील पावसाने प्राणहानी आणि वित्तहानी झाली असली तरी त्याहून अधिक हानी जमिनीची झाली असून ती अद्याप कुणाच्या लक्षात आलेली नाही. बादल्यांनी आकाशातून पाणी ओतावे इतक्या जोरात पाऊस पडल्याने शेतीतील पिके नष्ट झालीच; परंतु त्याचबरोबर शेती खरवडून निघाली. माती वाहून गेली. वरचा थर नष्ट झाल्याने आता ती जमीन नापीक झाली आहे. माती तयार व्हायला शेकडो वर्षे जातात. कृत्रिम पद्धतीने माती तयार करण्याला मर्यादा आहेत. हे एकदा लक्षात घेतले की ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता समजू शकते.

उत्तराखंड, पंजाब, महाराष्ट्र, काश्मीर, हिमाचल प्रदेशासह देशभरात झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर आले तसेच भूस्खलन झाले. अनेक इमारती आणि वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली, काही लोक अडकले. हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांत यंदा आधीच असंख्य ढगफुटी झाल्या आहेत.

ढगफुटी काही मिनिटांपासून ते अनेक तासांपर्यंत टिकू शकतात. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशात हलका, मध्यम, मुसळधार किंवा खूप मुसळधार पाऊस पडेल का नाही हे सांगू शकतात; पण ढगफुटीसारख्या घटनांचा अचूक अंदाज लावणे कठीण आहे.

महाराष्ट्रात ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्रीतून झालेल्या पावसाने झोडपले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ओढ्यांना पूर आला असून अनेक गावांमधील घरांत पाणी शिरले.

लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांत बेफाम पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, अनेक गावांचा संपर्क तुटला. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, लष्कर तसेच इतर दलांना उसाच्या शेतात होड्या, काही ठिकाणी हेलिकॉप्टर वापरून लोकांना बाहेर काढावे लागले.

संकटाची तीव्रता लक्षात यावी म्हणूनच हे सर्व महत्त्वाचे आहे. मात्र संकटाची गती आणि राज्य सरकारच्या मदतीचा हात आखडता यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवला. मागील तीन हजार कोटींची मदत अजूनही मिळालेली नाही. आता किती मदत लागेल, याचा अंदाज नाही.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची आवश्यकता आहे. मोडून पडलेल्यांना पुन्हा उभे करण्याची गरज आहे. सरकारने झापडबंद कारभार सोडून संकटात तरी लढण्याचे बळ दिले पाहिजे.

भागा वरखडे