जळगाव ७ ऑगस्ट २०२४ : जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगर येथील महाविद्यालयीन तरुणीने धावत्या रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार काल दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
प्रियंका अरुण गोसावी (वय २४, रा. एकनाथ नगर, मेहरूण परिसर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मेहरूणमध्ये एकनाथ नगरात परिवारासह राहत होती. तिचे जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण सुरू होते. बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ती महाविद्यालयात गेली. दुपारी म्हसावद ते डोमगाव रस्त्यालगत तिने तिची दुचाकी लाऊन डाऊन लाइनवरच्या रुळावर स्वतःला झोकून देत काशी एक्सप्रेससमोर आत्महत्या केली.
रुळावरील गँगमनला घटना समजताच त्यांनी स्टेशन मास्तरला कळविले. त्यावरून रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तरुणीची बॅग, मोबाईल आढळले. त्यात महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली. त्यावरून तिची ओळख पटली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला देखील माहिती मिळताच त्यांनी तरुणीच्या नातेवाईकांना माहिती दिली असून तरुणीने आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद जीआरपी पोलिसांकडे करण्यात येत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : पंकज पाटील