मुंबई, २२ नोव्हेंबर २०२०: एनसीबी ड्रग्जच्या प्रकरणात सतत कारवाई करत असल्याचं दिसत आहे. शनिवारी एनसीबीनं कॉमेडियन भारतीला मुंबईत अटक केली आहे. तिचा नवरा हर्ष याच्याकडं चौकशी केली जात आहे. अटकेची तलवार हर्षवरही टांगली आहे. हर्षलाही अटक होऊ शकते. भारती यांना काल रात्री एनसीबी कार्यालयात ताब्यात ठेवण्यात आलं असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
शनिवारी एनसीबीनं मुंबईत ३ ठिकाणी छापे टाकले. भारती आणि त्यांचा नवरा हर्ष यांच्या घरी छापा टाकण्यात आला. भारती यांच्या फ्लॅटमधून गांजा सापडला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना एनसीबीनं समन्स बजावले. आता भारती यांना अटक करण्यात आली आहे.
या ठिकाणी एनसीबीनं छापा टाकला
२१ नोव्हेंबर रोजी एनसीबीनं खार दांडा भागात छापा टाकला आणि २१ वर्षांच्या एका तस्कराला एलएसडी, गांजा (४० ग्रॅम) आणि नाईट्राझेपम (Nitrazepam) (सायकोट्रॉपिक ड्रग्स) यासह जेरबंद केलं.
यानंतर एनसीबीनं शनिवारी इतर दोन ठिकाणी छापा टाकला, त्यात कॉमेडियन भारती सिंगच्या प्रॉडक्शन ऑफिस आणि घर (दोन्ही ठिकाणी) ७५.५ ग्रॅम गांजा सापडला. भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजाचं सेवन कबूल केलंय. एनडीपीएस कायदा १९८६ च्या तरतुदींनुसार भारती सिंग यांना अटक करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे