कोरोनग्रस्ताच्या कुटुंबीयांची चाचणी निगेटिव्ह, बारामतीकरांना दिलासा

6

बारामती: शहरातील म्हाडा कॉलनीतील कोरोनाग्रस्ताचा मुलगा व नातू या दोघांचेही कोरोनाच्या टेस्ट निगेटीव्ह आल्याने बारामतीकरांना आज पुन्हा एकदा दिलासा मिळाला. दरम्यान ज्या २६ जणांच्या घशातील द्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने अधिकचा दिलासा मिळाला आहे.

बारामतीतील एकही रुग्ण आता डेंजर झोनमध्ये नसल्याने शहराने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. असे असले तरी लॉकडाऊन शिथील करण्याबाबत कोणताही विचार तातडीने होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाच्या मुलासह त्याचा नातू या दोघांचीही तपासणी होण्यास काहीसा विलंब झाला होता, मात्र आज त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सामाजिक संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी ज्या साठ वर्ष वयापुढील ज्येष्ठ नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले होते, त्यांचेही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने लॉकडाऊनचा फायदा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान आणखी काही ज्येष्ठ नागरिकांच्या घशातील द्रावांचे सोमवार किंवा मंगळवारी सुरक्षिततेचा उपाय म्हणून नमुने घेतले जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

                                                                                              प्रतिनिधी- अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा