कदमवाकवस्ती : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कदमवाकवस्ती,लोणी काळभोर पोलीस व प्रशासन यांच्या वतीने गावात येण्यास व गावातून बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कदमवाकवस्ती येथील नागरीकांच्या जिवीताच्या सुरक्षेसाठी काही कडक व ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मंगळवार(दि.२४)पासून कदमवाकवस्ती गावातून बाहेर व गावामध्ये कोणालाही ये-जा करता येणार नाही. प्रत्येक वार्ड मधील रस्त्यावर तेथील ग्रा. पं. सदस्य, पोलीस कर्मचारी व इतर ५ जणांचे पथक गस्तीसाठी तैनात असणार आहे. त्या गस्तीपथकास ग्रामपंचायतच्या वतीने अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक कारण असेल तरच घरातील फक्त एकच व्यक्ती मास्क लावून व सॅनिटायझेर बरोबर घेऊन बाहेर पडेल व चेक पोस्टवर रजिस्टर वर एन्ट्री करून दिलेल्या वेळात परत माघारी येईल. इतर कुठल्याही अनावश्यक कारणासाठी कोणीही घराबाहेर पडू शकत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. ग्रामपंचायतला सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जर कोणास कोरोनाची लक्षणे जाणवत असतील किंवा कोणाच्या काही सुचना असतील तर आपल्या विभागातील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक, पोलीस, प्रशासन, सरपंच ई. सरकारी कर्मचार्यांना आपण तातडीने कळवाव्यात. असे आवाहन करण्यात आले.