काल एका १३ वर्षाच्या मुलाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. माझी मोलकरीण मला सकाळी सांगत होती. मनात विचार आला की अजून जग काय आहे, हे या मुलाला समजलंही नसेल आणि त्याने जीवन संपवलं. असं नक्की त्याच्या आयुष्यात काय वादळ आलं, म्हणून त्याने ही टोकाची भूमिका घेतली. संध्याकाळी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईला भेटले. ती म्हणाली, मला कधी कळालच नाही की त्याला काय म्हणायचं होतं… मी त्याच्या आईचे सांत्वन करुन घरी आले. तेव्हा लक्षात आलं की, काहीतरी नक्कीच राहून गेलं.
दुसऱ्या दिवशी मग लक्षात आले की सध्या काय घडतयं. यासाठी पालक म्हणून आपल्या जवाबदाऱ्या आपण कायम पार पाडल्या पाहिजेत.
१. आपला पाल्य हा आपलं सर्वस्व आहे. तेव्हा त्याच्याशी रोज न चुकता काही वेळ घालवा. त्यावेळी मोबाईल किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवा. तो वेळ त्या मुलाशी गप्पा मारण्यात घालवा.
२. आपला मुलगा रोज कुठे जातो, त्याचे मित्र–मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे नंबर आणि त्यांच्याशी तुमचा संपर्क असणे गरजेचे आहे.
३. आपल्या मुलाचा मूड बिघडला असल्यास पालक म्हणून तुम्ही शांत रहा. पण नंतर वातावरण निवळल्यानंतर त्याच्याशी बोला. त्याचा प्रॉब्लेम समजावून घ्या. अन्यथा तेच विचार त्याच्या डोक्यात कायम राहतील, ज्याचे विपरीत परिणाम भविष्यात जाणवू शकाल.
४. आठवड्यातील एक सुट्टी मुलांसोबत घालवा. त्याचे कपाट आवरणे, कपडे खरेदी करणे किंवा त्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्याने मुलांचे मन हलके होते.
५. मुलांनी हट्ट केल्यानंतर त्यांचे हट्ट पुरविलेच पाहिजे, हे गरजेचे नाही. जी गोष्ट हवी आहे, ती उपयोगी आहे किंवा नाही याची जाणीव मुलांना करुन द्या.
६. लहान पणापासून मुलांना पैसे साठवण्याची सवय लावा. ज्यामुळे भविष्यात मुलांना त्याचे महत्त्व कळेल.
७. घरातील मोठ्या व्यक्तींनां, तसेच बाहेरच्या ज्येष्ठ व्यक्तींना आदर देण्याची मुलांना सवय लावणे गरजेचे आहे.
८. मुलांना सर्वसामांन्यात मिसळून खेळण्याची सवय लावा. मैदानी खेळ हे मुलांचे मन फ्रेश करण्याचे सगळ्यात मोठे साधन आहे. शारिरीक खेळामुळे मुलांचे मन ताजेतवाने रहाते.
९. मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तू वापरण्यासाठी मुलांना वेळ ठरवून द्या, जेणेकरुन तेवढाच वेळ मुलं त्या वस्तू वापरतील. ज्याचा शरीरावर परिणाम होणार नाही.
पालक आणि मुलं हे नातं, अनोखं आणि अमूल्य असतं. त्यामुळे हे नातं जपलं तर खरे पालकत्व जपल्याचा तुम्हाला आनंद मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस