प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वंदे भारतम् नृत्य उत्सव’मधील स्पर्धकांचे पाच जानेवारीपासून दिल्लीत प्रशिक्षण

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२२ : सांस्कृतिक मंत्रालयाने ‘वंदे भारतम् नृत्य उत्सव २०२३’ची दोनदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा (ग्रँड फिनाले) ता. १९ डिसेंबरपासून जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ९८० नर्तकांची निवड करण्यात आली होती. अंतिम स्पर्धकांमधून निवडलेले ५०० नर्तक ‘नारी शक्ती’ या थीमवर २०२३ च्या प्रजासत्ताक दिनादरम्यान एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.

‘वंदे भारतम् नृत्य उत्सव २०२३’ ही प्रजासत्ताक दिन उत्सव २०२३ च्या अंतर्गत सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेली नृत्यस्पर्धा कार्यक्रम आहे. ही स्पर्धा राज्य-केंद्रशासित प्रदेश स्तर, झोन स्तर आणि राष्ट्रीय स्तर अशा ३ टप्प्यांमध्ये आयोजिण्यात आली आहे. १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत लोक, आदिवासी, शास्त्रीय आणि समकालीन फ्युजन या प्रकारांमध्ये १७ ते ३० वर्षे वयोगटातील सहभागींकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांद्वारे १७ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्य-केंद्रशासित प्रदेश स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

ग्रँड फिनालेमध्ये २० डिसेंबर २०२२ च्या संध्याकाळी एक विशेष सोहळाही आयोजित केला गेला. या सोहळ्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र मंत्री जी. के. रेड्डी, संस्कृती आणि परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संसदीय कामकाज अर्जुन राम मेघवाल यांची विशेष उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत ५०० स्पर्धकांना निवडण्यात आले. भारताचा वेगवेगळ्या भागांमधून उत्कृष्ट नृत्यकला घेऊन अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. वेगवेगळ्या नृत्यकलांचे येथे प्रदर्शन झाले. ‘वंदे भारतम् नृत्य उत्सव २०२३’ या प्रजासत्ताक दिन उत्सव २०२३ च्या अंतर्गत घेतल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये निवडून आलेल्या ५०० नर्तकांचे ५ जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त दिल्लीमध्ये प्रशिक्षण सुरू होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा