उत्तर प्रदेश, १२ डिसेंबर २०२२ : अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा अडचणींत सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, एका विद्यार्थ्याला चुकून स्कुटीची धडक लागल्याने अभिनेता राजपाल यादव संकटात अडकला आहे. राजपाल यादव आणि संपूर्ण टीम विरोधात संबंधित विद्यार्थ्यांने तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधील कलोनलगंजमध्ये राजपाल यादव चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी राजपालला स्कूटी चालायची होती. स्कूटी चालवण्याच्या सीनदरम्यान राजपालचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती स्कूटी एका विद्यार्थ्याला जाऊन धडकली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, चित्रपटाच्या टीमने गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत संबंधित विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली.
राजपाल यादव हा त्याचा ‘लक्ष्मी टॉकीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिथे गेला होता. शूटिंगदरम्यान राजपाल चालवत असलेली स्कूटर ही खूप जुनी होती. त्यामुळे त्याच्यावरील नियंत्रण सुटून विद्यार्थ्यांना धडक लागली. मात्र, या घटनेत विद्यार्थ्याला कोणतीच दुखापत झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पुढील तपासानंतर कोणती कारवाई करावी हे ठरवले जाईल, असे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तर विद्यार्थ्याने तक्रार दाखल केल्यानंतर या घटनेप्रकरणी राजपाल यादव आणि चित्रपटाच्या टीममधील अन्य सदस्यांनीही संबंधित विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाकडून परवानगी घेऊन शूटिंग करत असताना त्यात अडथळे आणण्याचे काम संबंधित विद्यार्थ्यांनी केले असा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याने कोणावरही मोठी कारवाई होणार नाही अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे