बेंबळे ग्रामपंचायत निवडणुकीतील गंभीर गैरप्रकाराबाबत तक्रार

माढा, २६ जानेवारी २०२१: बेंबळे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२०- २१ मध्ये गंभीर गैरप्रकार केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे विरोधात तक्रार दाखल झाली आहे. दोन प्रभागांमध्ये फेरनिवडणुकीची मागणी नितीन अनपट, सुवर्णा भोसले आणि बापू काळे यांनी केलेली आहे.

माढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील अशा बेंबळे ग्रामपंचायत मध्ये मतदार संख्या सुमारे पाच हजार आठशे असून एकूण पाच प्रभागांची निवडणूक,निवडणूक आयोगामार्फत लागली होती. पैकी प्रभाग क्रमांक ३, प्रभाग क्रमांक ४ मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर व जाणीवपूर्वक निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे पराभव झाला, अशी तक्रार बेंबळे गावचे संबंधित प्रभागातील ऊमेदवार सुवर्णा भोसले, नितीन अनपट आणि बापू काळे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत तपशीलवार माहिती देताना तक्रार करणाऱ्यांनी सांगितले की, सदर प्रभाग क्रमांक ३ आणि प्रभाग क्रमांक ४ निवडणुकीतील प्रचार करताना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे बॅलेट पेपर मधील सिरीयल आणि बॅलेट पेपरच्या रचनेचा वापर केलेला होता. परंतु, बेकायदेशीरपणे जाणूनबुजून या प्रक्रियेतील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बॅलेट पेपरवरील चिन्ह आणि वर्गवारीचा क्रम बदलल्यामुळे आमचा पराभव झाला. तरी निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळेच सदर निवडणूक ही परत घ्यावी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी तक्रार केलेली आहे. या विषयाबाबत निवडणूक आयोग यंत्रणेसह सर्व संबंधितांना तक्रार पाठवून याविषयी न्यायालयातही दाद मागणार असल्याबाबत नितीन अनपट, सुवर्णा भोसले व बापू काळे यांनी सांगितले.

या तक्रारी मुळे माढा तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दुटप्पी धोरणाबाबत समाजामध्ये आणि बेंबळे गावामध्ये प्रक्षोभ निर्माण झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा