माणगांव, १४ मे २०२४ : मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल ओपन अंब्रेला, खरवली-साले फाटा येथील ओव्हरब्रीजच्या बाजूचे सर्व्हिस रोड व नाल्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. त्यामुळे साले, खरवली, पेण या पंचक्रोशीतील नागरिकांना, मिनीडोअर, रिक्षा, एस.टी. चालक तसेच इतर वाहन चालकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे. येत्या १५-२० दिवसांत पावसाचे आगमन झाल्यास सर्व्हिस रोड व नाल्याच्या रखडलेल्या कामामुळे साले-खरवली पंचक्रोशीतील तसेच तळा तालुक्यात जाणाऱ्या वाहनचालकांसमोर गंभीर समस्या उभी राहणार आहे. सदर बाब लक्षात घेता साले येथील रिक्षा चालक, सेवाभावी व्यक्तिमत्व सुरज सांगले, शिवसेना शाखाप्रमुख शैलेश जंगम यांनी व सहकारी यांनी सदर रस्त्याचे, नाल्याचे काम लवकरात मार्गी लागावे यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्याकडे संपर्क साधला.
युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापक, कर्मचारी यांना तातडीने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी बोलावून परिस्थितीची पाहणी केली. ऐन पावसाळ्यात वाहनचालकांना कोणताही त्रास होता कामा नये. याकरिता सदर रखडलेले काम त्वरित चालू करून पूर्ण करा. अन्यथा साले ग्रामस्थांबरोबरच संपूर्ण विभागातील नागरिक कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना दिला.
खरवली-साले फाट्यावरील ओव्हरब्रीजच्या बाजूच्या सर्व्हिस रोड व नाल्याचे रखडलेले काम त्वरित सुरु करून पूर्ण करू जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही असे सकारात्मक आश्वासन कंपनीच्या वतीने व्यवस्थापक श्री. दत्ता मस्कर यांनी दिले.
यावेळी दिपकशेठ चव्हाण, शरद भोनकर (साले ग्रामपंचायत सदस्य), संजय सांगले, शैलेश जंगम, नितेश जंगम, सूरज सांगले, चेतन सांगले, संदेश भोनकर, मिलिंद भोनकर, धोंडू राम भोनकर, प्रतिक भोनकर, मयूर भोनकर, सुमित भोनकर, नितीन भोनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनीधी : प्रमोद जाधव