मुंबई, दि. १० जून २०२०: आर्थिक संकटात सापडलेल्या मत्स्य व्यवसायाशी निगडित कुटुंबांना दिलासा देण्यासह दुध भुकटी प्रकल्पाला दुध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक पार पडली. दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार देखील या बैठकीत उपस्थित होते.
मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक बीज विकास, लिलाव प्राप्त संस्थांना रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, एक धरण एक संस्था यासह या क्षेत्रातील रोजगार संधी लक्षात घेता विविध प्रोत्साहन योजनांचा समावेश असलेले सर्वांकष धोरण तातडीने राबवावे असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या दुधभुकटी प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मोबदला रक्कम द्यावी. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रक्कम थकीत राहता कामा नये असे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना यापुढील शासकीय सेवेतील भरती प्रसंगी प्राधान्याने सामावून घ्यावे. अनेक अधिपरिचारिकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर व साकोली येथील नगरपालिकेच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्या. या योजनांसाठी प्रशासकीय मान्यता आणि अन्य आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करा असे आदेश त्यांनी दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी