पुणे, दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ : मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पुणे शहरांमध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर ही झाला आहे. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.पुणेकरांकडून आता पुढील दहा दिवस कुठलाही दंड आकारण्यात येणार नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.
सध्या दिवाळीचा सण तोंडावर आहे.या काळात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशात नियमांच उल्लंघन केल्यामुळे त्यांना दंड द्यावा लागत होता. परंतु या कारवाईमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पोलिसांना वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात अडचण येत होती. त्यामुळे पुढील दहा दिवस पोलिसांकडून नागरिकांना कुठलाही दंड आकारण्यात येणार नाही. त्याच बरोबर वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पुढील काही दिवसांवर दिवाळी सण आला आहे. या सणानिमित्त खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, बाजीराव रस्ता, बोहरी आळी यानेहमी गजबजलेल्या परिसरात गर्दी करतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर