प्रेमाचा प्रवास सुरूच आहे असे ट्विट करत राहुल गांधी लेहहून १३० किमी बाईक चालवत लामायुरूला पोहोचले

लामायुरू, लडाख २३ ऑगस्ट २०२३ : मंगळवारी (२२ ऑगस्ट) काँग्रेस नेते राहुल गांधी लेहहून बाईक चालवत १३० किलोमीटर दूर असलेल्या लामायुरूला पोहोचले. प्रेमाचा प्रवास सुरूच आहे असे लिहीत काँग्रेसने राहुल यांच्या या प्रवासाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. राहुल गांधी २५ ऑगस्टपर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत. आज राहुल गांधी कारगिलच्या झांस्कर तहसील या भागात बाईकने पोहचणार असुन ते गुरुवारी कारगिल टाऊनला पोहोचतील.

या दौऱ्यात राहुल स्थानिक लोकांचीही भेट घेत आहेत. काँग्रेसने म्हंटले आहे की, लडाख भेट हा भारत जोडो यात्रेचाच विस्तार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी सांगितले की, राहुल यांचा लडाख दौरा हा त्यांच्या भारत जोडो यात्रेचा विस्तार आहे. जयराम म्हणाले- जानेवारीमध्ये लडाखच्या लोकांच्या शिष्टमंडळाने राहुल यांना लडाखमध्ये येण्यास सांगितले होते. त्यामुळे राहुल संपूर्ण लडाखमध्ये फिरत आहेत. लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल-कारगिल निवडणुकीच्या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी राहुल सहभागी होणार आहेत.

राहुल यांच्या लडाख भेटीत २१ ऑगस्टला लेहच्या बाजारात रात्री तिरंगा फडकवण्यात आला, राहुल यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसमवेत तिरंगा फडकावला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. तसेच राहुल यांनी लेह मार्केटमध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. त्यांनी बाजारात शॉपिंग करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. २६४ किमी बाईक चालवत ते खार्दुंग ला पोहोचले. राहुल यांनी खार्दुंग ला येथे बाइकर्सच्या ग्रुपसोबत आणि स्थानिक लोकांसोबत छायाचित्रे काढली. २० ऑगस्ट रोजी, राहुल यांनी त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पॅंगोंग त्सो तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली. १९ ऑगस्ट रोजी राहुलने पॅंगॉन्ग त्सो तलावापर्यंत बाईक चालवली. यादरम्यान ते रायडर लूकमध्ये दिसले. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी लेह मधिल तरुणांशी संवाद साधला.स्थानिक फुटबॉल सामना पाहिला, दुसऱ्या एका कार्यक्रमात त्यांनी स्थानिक महिलांसोबत डान्सही केला. १७ ऑगस्ट हा राहुल यांच्या लेह-लडाख दौऱ्याचा पहिला दिवस होता. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर प्रथमच राहुल गांधी तिथे गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा