नवी दिल्ली १९ मे २०२३: ७० वर्षांनंतर परदेशातून भारतात आलेल्या चित्त्यांचे एकामागून एक मृत्यु होत आहेत. कारणे वेगवेगळी असली तरी होणारे मृत्यू हे चिंताजनक आहेत,असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दोन महिन्यांत तीन आफ्रिकन चित्त्यांच्या मृत्यूबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. चित्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन न्यायालयाने, केंद्राच्या वन्यजीव तज्ज्ञ समितीला(चित्ता टास्क फोर्स) चित्त्यांना इतरत्र हलवण्या संदर्भात,१५ दिवसांत ठोस उपाय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच उदय हा नर चित्ता हृदयाच्या धमनी निकामी झाल्यामुळे मरण पावला. पोस्टमॉर्टमच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. नामिबियाने हे चित्ते भारताला भेट म्हणून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते सोडले होते. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्त्यांची आणखी एक तुकडी कुनो येथे आणण्यात आली.
तज्ज्ञांच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की कुनोमध्ये चित्त्यांच्या मोठ्या लोकसंख्येसाठी पुरेशी जागा आणि संसाधने नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने चित्त्यांना दुसऱ्या उद्यानात किंवा अभयारण्यात हलवण्याचा विचार करावा.राजकारणापासून वर जाऊन केंद्र सरकारने चित्त्यांना राजस्थानला हलवण्याचा विचार करावा, असे न्यायमूर्ती बीआर गवई आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले.
केंद्रसरकार चित्त्यांसाठी अनुकूल वातावरण असणाऱ्या राजस्थानमध्ये जागा का शोधत नाही? तिथे विरोधी पक्ष सत्ताधारी आहे म्हणून तुम्हाला राजस्थान योग्य वाटत नाही का? असे काही तिखट प्रश्न कोर्टाने विचारले. तसेच,आम्ही सरकारच्या हेतूवर शंका घेत नाही, परंतु चित्ता तज्ज्ञांच्या अहवालाकडे लक्ष न दिल्याने चित्त्यांचे मृत्यु होतायत असे कळते. त्यामुळे आम्हाला काळजी वाटते. तज्ज्ञांच्या अहवालामध्ये चित्त्यांसाठी एकापेक्षा जास्त अधिवास निर्माण करण्याचा सल्ला केंद्रसरकार ला देण्यात आला होता. त्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसतंय. असेही कोर्टाने सरकारला सुनावलं.
केंद्रसरकार कडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी बाजू मांडताना म्हणाल्या की, चित्ता टास्क फोर्स टीम ही चित्त्यांच्या मृत्यूचे कारण आणि ते दुसऱ्या प्रदेशात हलवण्या बाबतच्या पैलूंचा अभ्यास करत आहे. सध्या कुनोमध्ये २ मादी चित्ता गरोदर असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. जूनमध्ये त्यांची डिलिव्हरी होऊ शकते. त्यांना लहान पिल्लांसह मोठ्या आवारात ठेवावे लागते. यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यासाठीच्या उपाययोजना सरकार करत आहे. चित्यांच्या दुसऱ्या घरासाठी सरकार प्रयत्नशील असून त्याबाबत नुकताच भोपाळमध्ये मुख्य सचिव इक्बाल सिंग बैंस यांनी चित्ता प्रकल्पाचा आढावा घेतला. त्यांनी मंदसौरचा गांधी सागर आणि सागरचा नौरादेही पार्क चित्त्यांसाठी त्वरित तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.