अजित पवारांवरील शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जनतेत जाण्याचं जाहीर केलं. यानंतर अजित पवार गटात आणि शरद पवार गटात जोरदार शाब्दिक युद्ध झालं. पण आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पक्षात फूट झाली नसल्याचं वक्तव्य केलं. एवढाच नाही तर शरद पवारांनी अजित पवार आमचेच नेते आहेत, ते भाजपसोबत गेले म्हणून पक्षात फूट पडली असं होत नाही, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली की,
थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य त्यांनी केले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न राजकारणात रस असणाऱ्यांना पडू लागला आहे.

बावनकुळे म्हणाले, वर्षभराच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वात विश्वकर्मा योजना, ओबीसी घटकांकरता योजना अशा अनेक योजनांवर काम सुरू आहे. गेल्या नऊ वर्षात जे निर्णय घेण्यात आलेले नाही ते निर्णय आम्ही वर्षभरात घेणार आहे. केंद्र सरकारचे हे काम पाहून शरद पवारांचे लवकरच मत आणि मनपरिवर्तन होईल. त्यानंतर अजित पवारांप्रमाणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील. दरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे आगामी काळात सत्तेत दिसतील असे वक्तव्य भाजप मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी केले आहे. उपाध्ये म्हणाले, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे लवकरच मनपरिवर्तन होणार याची खात्री आहे.

काँग्रेस नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना पक्षाची काळजी असेल. निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रकरण सुरू असताना मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असं सांगणं त्यांच्या रणनीतीचा भाग असू शकतो. मात्र, आम्ही त्यात खोल जाण्याचा संबंधच येत नाही.

पवार यांच्या विधानामुळे जनतेत संभ्रम होत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. हा प्रतिक्रियांचा धुरळा सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी त्यात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी तर डोकं फुटायची वेळ येईल, असं विधानच केलं आहे. बच्चू कडू हे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे थेट ऑलिम्पिकच असू शकेल. पवार काका पुतण्या हे लोकांना वेड्यात काढत आहेत. जास्त लक्ष दिलं तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार साहेब जे बोलतात ते करत नाही. जे बोलत नाहीत ते करतात. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं तसं इथं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन तीन रस्ते पाहून ठेवले असतील. सगळ्यांचा संगम करून स्वतःचाच एक सागर निर्माण करत असतील, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी एकसंघ असल्याचंच सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. अजित पवार पुन्हा माघारी येणार? का शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार ? हे येत्या काळात लवकरच समजेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा